कामशेत : येवलेवाडी येथे अंत्यविधी उघड्यावरच लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष; ग्रामस्थ नाराज | पुढारी

कामशेत : येवलेवाडी येथे अंत्यविधी उघड्यावरच लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष; ग्रामस्थ नाराज

कामशेत : एकीकडे स्मार्ट सिटी, स्मार्ट गावाकडे वाटचाल करत असताना अजूनही मुंबई-पुणे महामार्गाला लागूनच असणार्‍या मावळ तालुक्यातील येवलेवाडीमध्ये उघड्यावरच अंत्यसंस्कार करावे लागत आहे. अंत्यविधीसाठी मोठंमोठे नेतेमंडळी येतात आणि स्मशानभूमीच्या जागेसाठी आश्वासन देतात; परंतु कोणत्याही प्रकारचा पाठपुरावा केला जात नसल्याची व्यथा येथील ग्रामस्थ व्यक्त करत आहेत.

ग्रामस्थांना नाहक त्रास

दरम्यान, या ठिकाणी काही नागरिक झाडाच्या सावलीत आसर्‍याला बसल्याचे चित्र दिसून येत आहे. पावसाळ्यामध्ये छत्री, रेनकोट किंवा एखाद्या झाडाचा आसरा घेऊन उभे राहावे लागते. दुःखात सहभागी होणार्‍या सर्व नागरिकांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
खड्डेमय रस्त्यातून प्रवास या सर्व बाबींचा विचार करता ग्रामपंचायत व शासनाने पुढाकार घेऊन जागेचा प्रश्न सोडवून त्या ठिकाणी निवारा शेड करण्याची मागणी नागरिक करत आहेत. काही ठिकाणी स्मशानभूमीपर्यंत जाण्यासाठी रस्ता नाही. त्या ठिकाणी नागरिकांनी रस्त्याची आणि स्ट्रीट लाईटची व्यवस्था करण्याचीही मागणी केली जात आहे.

निवारा शेडचा अभाव

येवलेवाडीसह ग्रामीण भागातील अनेक ठिकाणी असे भयानक वास्तव आहे. काही ठिकाणी जागेच्या अडचणीमुळे स्मशानभूमीसुद्धा नाही. परिणामी त्या ठिकाणी अंत्यविधी उघड्यावरच करावा लागत आहे. निवारा शेड नसल्यामुळे येथे येणार्‍या नागरिकांना उन्हं आणि पावसाचा सामना करावा लागत आहे.

ग्रामपंचायत व सरकारने पुढाकार घेऊन जागेचा प्रश्न सोडवून निवारा शेड करण्याची आवश्यकता आहे. गावातील नागरिकांना अंत्यविधी वेळी अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. पावसामध्ये नागरिकांचे मोठ्या प्रमाणात हाल होतात.
– कांताराम येवले, ग्रामस्थ येवलेवाडी-नायगाव

आम्ही प्रस्ताव मंजुरीसाठी पुढे पाठवला आहे. जागा उपलब्ध नसल्यामुळे स्मशानभूमीचे काम थांबले आहे. जर कोणी स्मशानभूमीसाठी जागा दिल्यास आम्ही ग्रामपंचायतीच्या निधीमधून स्मशानभूमीचे काम लवकरात लवकर सुरू करू.
– विजय सातकर, सरपंच, कान्हे ग्रुप ग्रामपंचायत

ग्रामपंचायतीचा प्रस्ताव आला असून जागेसंबंधी प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठवला आहे. त्यासंदर्भात अजून जिल्हाधिकारी कार्यालयाकडून काही उत्तर आले नाही.
– खांडेकर, मावळ पंचायत समिती विस्तार अधिकारी

Back to top button