पुणे : युवक काँग्रेस शहराध्यक्षाचे निलंबन; नेत्यांमध्येच जुंपली, शिरसाठ पक्षात व पदावर कायम असल्याचा प्रदेशाध्यक्षांचा खुलासा | पुढारी

पुणे : युवक काँग्रेस शहराध्यक्षाचे निलंबन; नेत्यांमध्येच जुंपली, शिरसाठ पक्षात व पदावर कायम असल्याचा प्रदेशाध्यक्षांचा खुलासा

पुणे, पुढारी वृत्तसेवा: पुणे शहर युवक काँग्रेसच्या अध्यक्षावर करण्यात आलेल्या कारवाईवरून आता काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांमध्येच जुंपली आहे. निलंबनाचे आदेश काढणार्‍या राष्ट्रीय सरचिटणीस प्रतिमा मुदगल यांना हे अधिकार नसल्याचे स्पष्ट करीत राहुल शिरसाठ हेच शहर युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदावर कायम असल्याचा खुलासा महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष कुणाल राऊत आणि प्रभारी मितेंद्र सिंग यांनी केला आहे.

काँग्रेसच्या महिला पदाधिकार्‍यांचा अनादर आणि युवक पदाधिकार्‍यांशी गैरवर्तन केल्याचे कारण देत युवक शहराध्यक्ष शिरसाठ यांना पक्षातून तीन वर्षांसाठी निलंबित करण्याचे आदेश युवकच्या राष्ट्रीय सरचिटणीस प्रतिमा मुदगल यांनी काढले होते. यासंबंधीचे वृत्त दै. ‘पुढारी’त प्रसिद्ध झाल्यानंतर मंगळवारी युवक प्रदेशाध्यक्ष राऊत यांनी पत्र काढून त्यावर खुलासा केला. मुदगल यांनी काढलेले कारवाईचे पत्र अधिकृत नसल्याचे स्पष्ट करीत शिरसाठ हे पदावर आणि पक्षात कायम असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

मात्र, याबाबत मुदगल यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी मात्र राष्ट्रीय सरचिटणीस म्हणून मला कारवाईचे अधिकार असून, युवक प्रदेशाध्यक्ष राऊत यांना ही कारवाई रोखण्याचा अधिकारच नाही. तसेच, याबाबत थेट माजी अध्यक्ष राहुल गांधी आणि प्रियंका गांधी- वढेरा यांच्याकडे तक्रार करणार असल्याचे दै. ‘पुढारी’शी बोलताना त्यांनी सांगितले. अध्यक्षांवरील निलंबन कारवाई आणि यासंबंधीचे अधिकार नक्की कोणाला, यावरून काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांमध्येच आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत.

Back to top button