पिंपरी: प्लेटलेट्ससाठी धावाधाव, डेंग्यू रुग्णांच्या नातेवाइकांना मोजावे लागताहेत अकरा हजार रुपये | पुढारी

पिंपरी: प्लेटलेट्ससाठी धावाधाव, डेंग्यू रुग्णांच्या नातेवाइकांना मोजावे लागताहेत अकरा हजार रुपये

दीपेश सुराणा

पिंपरी: सध्या डेंग्यूची रुग्णसंख्या वाढत असून, त्यांच्या शरीरातील प्लेटलेट्स झपाट्याने कमी होत आहेत. त्यामुळे प्लेटलेट्ससाठी सध्या रुग्णाच्या नातेवाइकांची धावाधाव सुरू आहे. या प्लेटलेट्स मिळविण्यासाठी नातेवाइकांना साडेनऊ ते अकरा हजार इतकी मोठी रक्कम मोजावी लागत आहे.

दिवसाला 50 हजार प्लेटलेट्सही होतात कमी

शहरामध्ये गेल्या दीड महिन्यात डेंग्यूचे 164 बाधित रुग्ण आढळले आहेत. सध्या डेंग्यू रुग्णांचा आलेख चढता आहे. महापालिकेच्या व खासगी रुग्णालयांमध्येदेखील डेंग्यूच्या रुग्णांवर उपचार सुरू आहेत. या रुग्णांमध्ये कधी-कधी दिवसाला 50 हजार प्लेटलेट्स कमी होतात. अशा परिस्थितीत रुग्णांना एकाच रक्तदात्याकडून घेतलेल्या प्लेटलेट्स (एसडीपी) किंवा विविध रक्तदात्यांकडून घेतलेल्या प्लेटलेट्स (आरडीपी) द्याव्या लागतात. रुग्णांच्या शरीरात जर प्लेटलेट्सची संख्या कमीत कमी दीड लाखापेक्षा अधिक आढळली तर घाबरण्याचे कारण नसल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे.

वाढती मागणी पुरविण्यात अडचणी

रक्तपेढ्यांकडे सध्या डेंग्यू रुग्णांसाठी प्लेटलेट्सची मागणी वाढली आहे. महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयातील रक्तपेढीतून एकाच रक्तदात्याकडून घेतलेल्या प्लेटलेट्सच्या (एसडीपी) दररोज 8 ते 10 पिशव्या दिल्या जात आहेत. एसडीपीऐवजी विविध रक्तदात्यांकडून घेतलेल्या प्लेटलेट्सचा (आरडीपी) पर्याय स्वीकारल्यास दररोज सरासरी 30 आरडीपी प्लेटलेट्स पिशव्या लागत आहेत. नागरिकांची वाढती मागणी पुरविण्यात अडचणी येत आहेत.

प्लेटलेट्सचा का वाढतो खर्च?

रक्तपेढ्यांना रक्तदात्यांकडून रक्त हे मोफत मिळते. मग, त्यानंतरही प्लेटलेट्ससाठी एवढा खर्च कसा लागतो, खर्च वाढण्यामागे नेमकी कारणे काय आहेत, याची माहिती जाणून घेतली. सध्या आरडीपीच्या एका पिशवीसाठी 500 ते 600 रुपये मोजावे लागतात. तर, एका एसडीपी पिशवीसाठी 9 हजार 500 ते 11 हजार इतकी रक्कम मोजावी लागत आहे.

एका रक्तदात्याच्या शरीरातून प्लेटलेट्स काढण्यासाठी दीड तासाचा कालावधी लागतो. तसेच, त्याच्या कीटसाठीच 9 हजार रुपये खर्च लागतो. त्याशिवाय, रक्तदात्याच्या प्लेटलेट्स घेण्यापूर्वी कावीळ, एचआयव्ही, हिपेटायटीस बी, सी, त्त्वचारोग, मलेरिया अशा विविध चाचण्या घ्याव्या लागतात. त्यामुळे हा खर्च वाढत असल्याचे रक्तपेढी चालकांनी सांगितले.

रक्तपेढीकडे सध्या दिवसाला 6 ते 7 एसडीपी पिशव्यांची मागणी आहे. रक्तदात्याच्या शरीरातील प्लेटलेट्स काढण्यासाठी लागणार्‍या कीटचा खर्च; तसेच रक्तदात्यावर कराव्या लागणार्‍या विविध चाचण्यांमुळे रुग्णांना प्लेटलेट्स घेण्यासाठी खर्च वाढतो. शासकीय दरानुसारच हा खर्च आकारला जातो.
– नीलेश गायकवाड, संचालक, मोरया ब्लड बँक

एका एसडीपी पिशवीमध्ये रुग्णाच्या 20 ते 25 हजार प्लेटलेट्सची गरज भागते. त्याउलट एका आरडीपी पिशवीतून 3 ते 5 हजार प्लेटलेट्सचीच गरज पूर्ण होते. सध्या रक्तदानाचे प्रमाण कमी असल्याने एसडीपी पिशव्यांचाच पर्याय स्वीकारला जात आहे.
– दीपक पाटील, प्रशासकीय व्यवस्थापक, पिंपरी सिरोलॉजिकल इन्स्टिट्यूट ब्लड बँक

Back to top button