पवार कुटुंबीय पाडव्याला गोविंदबागेत भेटणार | पुढारी

पवार कुटुंबीय पाडव्याला गोविंदबागेत भेटणार

बारामती, पुढारी वृत्तसेवा: ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार, विरोधी पक्षनेते अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे हे दिवाळी पाडव्यानिमित्त बुधवारी (दि. 26) सकाळी आठ ते दुपारी एक या वेळेत गोविंदबाग येथे नागरिकांना भेटणार आहेत. दरवर्षी दिवाळीच्या पाडव्याच्या दिवशी गोविंदबागेत या तीनही नेत्यांना भेटण्यासाठी राज्याच्या कानाकोपर्‍यातून लोक येत असतात. यामध्ये आमदार, खासदार, मंर्त्यांसह विविध अधिकारी, पदाधिकारी व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकत्र्यांचा समावेश असतो. कोविडच्या संकटामध्ये या प्रथेवर मर्यादा आली होती. यंदा कोविडचे संकट दूर झालेले असल्याने सकाळी आठ वाजल्यापासूनच हे तीनही नेते नागरिकांना भेटणार आहेत.

पाडव्यानिमित्त गोविंदबागेमध्ये दरवर्षी नागरिक या नेत्यांना भेटण्यासह इतर अनेक मित्रपरिवाराला देखील भेटून दिवाळीच्या शुभेच्छा देतात. त्यामुळे गोविंदबागेमध्ये प्रचंड गर्दी होत असते. सुरक्षेच्या दृष्टीने तसेच वाहन पार्किंगपासून ते वाहतूक नियमन व्यवस्थेचे पोलिसांकडून या ठिकाणी आवश्यक ते नियोजन करण्यात आले आहे.

प्रथेनुसार व्यापारीवर्गाशी संवाद

गेल्या अनेक वर्षांपासून चालत आलेल्या प्रथेनुसार ज्येष्ठ नेते शरद पवार बुधवारी पाच वाजता बारामतीतील श्री महावीर भवन येथे व्यापार्‍यांशी संवाद साधतील. आगामी वर्ष कसे असेल, या वर्षामध्ये काय उलाढाली होतील, पीकपाणी कसे असेल, तसेच देशातील तसेच आंतरराष्ट्रीय बाजारपेठेची स्थिती कशी असेल आदी विषयांवर पवार दरवर्षी व्यापार्‍यांना मार्गदर्शन करतात. त्यांच्या मार्गदर्शनाची व्यापारीवर्गामध्ये उत्सुकता असते.

Back to top button