पुणे : चोरट्यांचा दिवाळी धमाका, पूजेसाठी आणलेल्या दागिन्यांसह दुकानांतील मालावर डल्ला | पुढारी

पुणे : चोरट्यांचा दिवाळी धमाका, पूजेसाठी आणलेल्या दागिन्यांसह दुकानांतील मालावर डल्ला

महेंद्र कांबळे

पुणे : दिवाळीनिमित्त लक्ष्मीपूजन, खरेदी ही होणारच. साहजिकच, व्यावसायिकही आपल्या दुकानात माल भरतातच, तर पूजेसाठी स्त्रीधनासह पैसे बाहेर निघतात, हीच बाब चोरट्यांच्या पथ्यावर पडत असून, रात्रीची दुकाने बंद होताच आतील माल पळविण्यासह पूजेसाठी काढलेल्या दागदागिन्यांसह रोख रकमेवर चोरटे डल्ला मारत आहेत. त्यामुळे ‘नागरिकांनी घराच्या सुरक्षिततेबाबत विशेष खबरदारी घ्यावी,’ असे आवाहन पुणे पोलिसांकडून करण्यात येत आहे.

आठ लाखांचे पळविले दागिने

धनत्रयोदशीच्या पूजेसाठी देवघरात ठेवलेले 7 लाख 93 हजारांचे सोन्याचे दागिने चोरट्यांनी लांबविल्याची घटना कर्वेनगर भागातील एका सोसायटीत घडली. याबाबत गौरांग होनराव (आदित्य बंगला, पुणे विद्यापीठ सोसायटी, कर्वेनगर) यांनी वारजे पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. होनराव यांनी धनत्रयोदशीच्या पूजेसाठी बँकेच्या लॉकरमधून दागिने घरी आणले होते. शनिवारी (22 ऑक्टोबर) होनराव यांनी देवघरात पूजेसाठी दागिने मांडले होते. विधिवत पूजन केल्यानंतर होनराव कुटुंबीय रात्री झोपले. स्वयंपाकघरातील मागील बाजूचा दरवाजा उघडा होता. दरवाजा बंद करण्यास होनराव विसरले. बंगल्यात शिरलेल्या चोरट्यांनी देवघरातील 226 ग्रॅम सोन्याचे आणि 50 ग्रॅम चांदीचे असे 7 लाख 93 हजार रुपये किमतीचे दागिने लांबविले. पूजेसाठी ठेवलेले दागिने चोरीला गेल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी पोलिसांकडे तक्रार दिली. पोलिस उपनिरीक्षक पारवे तपास करीत आहेत.

दुकान फोडून 40 मोबाईल लंपास

धनत्रयोदशीच्या दिवशी हडपसर भागातील एका मोबाईल विक्री दुकानातील खिडकी उचकटून चोरट्यांनी सात लाख 18 हजार 378 रुपयांचे 40 मोबाईल संच लांबविले. याबाबत स्वप्निल परमाळे (वय 34, रा. उरुळी देवाची, सासवड रस्ता) यांनी हडपसर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. परमाळे यांचे हडपसर भागातील हांडेवाडी परिसरात न्यू साई मोबाईल दुकान आहे. चोरट्यांनी मोबाऊल दुकानाच्या दरवाजाजवळ असलेली खिडकी उचकटून आत प्रवेश केला. दुकानात ठेवलेले 40 मोबाईल चोरून चोरटे पसार झाले.

सुट्यांचे नियोजन आवश्यक

मान्य नागरिकांप्रमाणेच पोलिसांना देखील मूळगावी कुटुंबासोबत दिवाळी साजरी करण्याची इच्छा होते. त्यासाठी ते धडपड करून सुट्या मंजूर करून घेतात. प्रभारी अधिकारी देखील बहुतांश कर्मचार्‍यांना दिवाळीसाठी सुट्या मिळाव्यात, यासाठी प्रयत्न करतात. त्याचा परिणाम गस्तीवर होऊन चोरट्यांचे फावते. त्यामुळे दिवाळीतील सुट्यांबाबत उच्चपदस्थ अधिकार्‍यांनी लक्ष देऊन नियोजन करण्याची आवश्यकता आहे.

तेलाचे डबे चोरीला

कोंढवा परिसरातील कानडेनगर परिसरात एका किराणा माल आणि शीतपेयाची विक्री करणार्‍या गोदामाचा पत्रा उचकटून चोरट्यांनी तेलाचे डबे, शीतपेयाची खोकी, काजू, बदाम, वेलदोड्याची पाकिटे असा 89 हजार 750 रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी चोरून नेला. याप्रकरणी चोरट्यांविरोधात कोंढवा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

महिलेचे दागिने लांबविले

लक्ष्मी रस्त्यावरील एका सराफी पेढीत खरेदीसाठी आलेल्या महिलेच्या पिशवीतून दोन लाख 35 हजार रुपयांचा ऐवज लांबविल्याची घटना घडली. याबाबत एका महिलेने विश्रामबाग पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार महिला सिंहगड रस्ता भागात राहायला आहे. त्या लक्ष्मी रस्त्यावरील एका सराफी पेढीत दागिने खरेदीसाठी आल्या होत्या. सोन्याच्या बांगड्या खरेदी केल्यानंतर महिलेने पिशवीत ठेवल्या. त्या वेळी महिलेच्या पिशवीतून दागिने लांबविले. सराफी पेढीतील सीसीटीव्ही चित्रीकरण पोलिसांनी तपासासाठी ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी दोन महिलांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Back to top button