दीपावलीबरोबरच गुलाबी थंडीचे आगमन; उत्सवाच्या आनंदात मोठी भर, बाजारपेठांमध्ये आर्थिक उलाढाल वाढली | पुढारी

दीपावलीबरोबरच गुलाबी थंडीचे आगमन; उत्सवाच्या आनंदात मोठी भर, बाजारपेठांमध्ये आर्थिक उलाढाल वाढली

बावडा, पुढारी वृत्तसेवा: दीपावली सणाबरोबरच गुलाबी थंडीचे झालेले आगमन व परतीच्या पावसाचे दूर झालेले संकट, यामुळे जनतेचा दिवाळी उत्सवाचा आनंद द्विगुणित झाला आहे. दीपावलीच्या पूर्वसंध्येला रविवारी सायंकाळपासून तापमानात घट झाल्याने नागरिकांना थंडी जाणवू लागली. त्यानंतर दीपावलीच्या पहिल्या अंघोळीला सोमवारी सकाळी चांगलीच थंडी निर्माण झाल्याने दिवाळी उत्सवाच्या आनंदात मोठी भर पडली. सोमवारी लक्ष्मीपूजन फटाक्यांच्या आतषबाजीत आणि उत्साही वातावरणात संपन्न झाले.

दोन वर्षांनंतर कोरोनामुक्त दिवाळी असल्याने बाजारपेठांमध्ये मोठी आर्थिक उलाढाल होत असल्याचे पोलिस पाटील शरद जगदाळे (टणु), प्रगतशील शेतकरी काशिनाथ अनपट (लाखेवाडी), रमेश काकडे (बावडा) यांनी सांगितले. त्यामुळे व्यावसायिकांमध्ये समाधानाचे वातावरण दिसत आहे. मात्र, परतीच्या पावसामुळे खरीप हंगामातील पिकांची लांबलेली काढणी व मळणीची कामे, यामुळे काही शेतकर्‍यांना दिवाळीसाठी खरीप पिकांपासून आर्थिक लाभ घेता आला नाही, असे शेतकरी विजयसिंह कानगुडे (शेटफळ हवेली) यांनी सांगितले.

ऐन दिवाळीपूर्वी प्रचंड पावसाने लोक मेटाकुटीला आले होते. परंतु, गेल्या दोन दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतल्याने सणाचा उत्साह वाढला आहे. बाजारपेठा भरून वाहू लागल्याने व्यापारीवर्गाला दिलासा मिळाला आहे. शेतकरीही आता शेतीच्या कामाला लागला आहे.

Back to top button