बारामती: जमीन खरेदीत विसारापोटी पाच लाख घेत फसवणूक | पुढारी

बारामती: जमीन खरेदीत विसारापोटी पाच लाख घेत फसवणूक

बारामती, पुढारी वृत्तसेवा: मी अडचणीत असल्याने शेत जमीन विक्रीला काढली आहे, ती तुम्ही घ्या, असे सांगत जमीन खरेदीच्या व्यवहाराच्या विसारापोटी पाच लाख रुपये घेत फसवणूक केल्याप्रकरणी सिद्धेश्वर पांडूरंग आयवळे (रा. बावी, ता. माढा, जि. सोलापूर) यांच्या विरोधात बारामती शहर पोलिस ठाण्यात फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हिराचंद जयसिंग काळभोर (रा. कुरणेवाडी, ता. बारामती) या प्राध्यापकाने याबाबत फिर्याद दिली. फिर्यादी हे महाविद्यालयात प्राध्यापक आहेत. त्यांचा चुलत भाऊ उद्धव सदाशिव काळभोर व राजेंद्र बबन यादव हे एकत्र असताना यादव यांच्या संदर्भाने सिद्धेश्वर पांडूरंग आयवळे यांची ओळख झाली होती. आयवळे यांनी मी सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयात कामाला असल्याचे सांगितले होते. त्यांच्या गप्पांमध्ये आयवळे याने वडगाव निंबाळकर (ता. बारामती) येथे गट नंबर ४६८ मध्ये माझी शेत जमीन आहे. कालव्यालगतची ही जमीन अतिशय चांगली आहे. मला अडचण असल्याने जमीन विक्रीसाठी काढलेली आहे. तुमचे गाव जवळ असल्याने तुम्ही ती घ्या, अशी गळ फिर्यादीला घातली. फिर्यादी व त्यांचे मित्र ही जमीन पाहण्याासाठी गेले.

या जमिनीचा ४० ते ५० लाख रुपये एकरी भाव आहे. पण मी अडचणीत असल्याने तुम्हाला २० लाखात जमीन देतो असे आयवळे म्हणाले. त्यानुसार विसार पावती करत त्यांनी पाच लाख रुपयांची मागणी केली. फिर्यादीने खरेदीखत करून द्या, अशी मागणी केल्यावर त्याने मी सरकारी नोकर आहे, माझ्यावर विश्वास ठेवा असे सांगत तात्पुरत्या स्वरुपात स्टॅम्पवर विसार पावती करून घ्या, मी खरेदीखत करून देतो, असे सांगितले. त्यानुसार वकिलांपुढे विसारपावतीचा दस्त नोंदविण्यात आला. त्यापोटी १२ ऑगस्ट २०२२ रोजी फिर्यादीने त्यांच्या बॅंक खात्यातून व फोन पे द्वारे वेगवेगळ्या तारखांना आयवळे यांना पाच लाख रुपये पाठवले. खरेदी दस्ताबाबत विचारणा केली असता तुम्ही उरलेली रक्कम तयार ठेवा, मी कधीही खरेदी द्यायला तयार असल्याचे आयवळे याने सांगितले.

एक महिन्यानंतर फिर्यादीने फोन करत त्यांना खरेदीखत करून देण्याची मागणी केली. त्यानंतर या जमिनीसंबंधी फिर्यादीने वृत्तपत्रात वकिलांद्वारे जाहीर नोटीस प्रसिद्ध केली. २९ सप्टेंबर ही खरेदीखताची ताऱीख ठरली. त्यासाठी फिर्यादीने सात-बारा उतारा काढला असता त्यावर एक फेरफार प्रलंबित असल्याचे दिसले. त्यांना शंका आल्याने त्यांनी अधिक माहिती घेतली असता हे क्षेत्र आयवळे याने यापूर्वीच प्रदीप बाबुराव गायकवाड, सुषमा योगेंद्र जगताप व उज्ज्वला जयराज देशमुख यांना ७ सप्टेंबर २०२२ रोजी खरेदीखताने दिल्याचे उघड झाले. त्यामुळे त्यांनी तात्काळ आयवळे यांना फोन केला. परंतु त्यांनी फोनवर उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यानंतर त्यांचा मोबाईल बंद लागला. त्यामुळे आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच काळभोर यांनी पोलिसांत फिर्याद दाखल केली.

Back to top button