….तेव्हा मोदी सुद्धा माझ्या बैठकीला यायचे ! एमसीए निवडणूक वादावर पवारांनी स्पष्ट केली भूमिका | पुढारी

....तेव्हा मोदी सुद्धा माझ्या बैठकीला यायचे ! एमसीए निवडणूक वादावर पवारांनी स्पष्ट केली भूमिका

बारामती : पुढारी वृत्तसेवा :  मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या नुकत्याच झालेल्या निवडणूकीत सर्वच पक्षांनी एकमेकांच्या गळ्यात गळे घातले. त्यावर जोरदार टीका झाली. यासंबंधी ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. जे लोक या विषयावरून राजकारण करत आहेत, त्यांचे ते अज्ञान आहे. काही ठिकाणं अशी असतात, जेथे राजकारण आणायचे नसते. जेव्हा मी बीसीसीआयचा अध्यक्ष होते त्यावेळी नरेंद्र मोदी हे गुजरातचे प्रतिनिधी म्हणून माझ्या बैठकांना हजर राहत होते. त्यांच्यासह दिल्लीचे अरुण जेटली , हिमाचलचे अनुराग ठाकुर हे अध्यक्ष होते. मी देशाचा आणि बाकीचे राज्याचे अध्यक्ष होते, आम्ही एकत्र काम केले. खेळाडूंना सुविधा देण्याचं आमचं काम आहे. बाकी गोष्टीत आम्ही लक्ष देत नाही, अशा शब्दात पवार यांनी भूमिका मांडली.

बारामतीत ते पत्रकारांशी बोलत होते. सर्वपक्षीय आघाडीमुळे मुंबई क्रिकेट असोसिएशनची नुकतीच झालेली निवडणूक गाजली. क्रिकेटर संदीप पाटील यांच्या विरोधात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, भाजप नेते आशिष शेलार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे सचिव मिलिंद नार्वेकर यांनी ताकद लावली. या राजकीय हितसंबंधांवर सध्या जोरदार टीका होत आहे. त्यावर पवार यांनी आपली भूमिका मांडली. जे लोक याविषयावर राजकारण करत आहेत, त्यांचं हे अज्ञान आहे, काही ठिकाणं अशी असतात त्यात राजकारण आणायचे नसते, असे पवार म्हणाले.

भारत जोडो यात्रेत सहभागी होणार
काॅंग्रेस नेते खासदार राहूल गांधी यांनी कन्याकुमारी ते काश्मिर या पदयात्रेचे आयोजन केले आहे. देशाच्या विविध भागातून ही भारत जोडो यात्रा जात आहे. ही यात्रा महाराष्ट्रात पोहोचल्यानंतर यामध्ये राष्ट्रवादी सहभागी होणार असल्याचे पवार म्हणाले. भारत जोडोच्या माध्यमातून समाजात सामंजस्य जोडण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे आम्ही सहभागी होत असल्याचे पवार म्हणाले.

..तर शंका कशाला घ्यायची?
माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मराठवाड्याच्या दौऱयावर जात आहेत. यासंबंधी पवार म्हणाले, कुणी शेतकऱयांच्या सुख-दुःखात सहभागी होण्यासाठी जात असेल तर कशाला शंका घ्यायची? त्यांनी दौऱयानंतर आपल्या मागण्या केंद्र व राज्य सरकारकडे कराव्यात. त्यातून शेतकऱ्यांचा फायदा झाला तर ती चांगली गोष्ट आहे.

यंदाचे वर्ष संमिश्र
यंदाचे संमिश्र अस वर्ष आहे. बाजारपेठ फुलून गेली आहे. राज्यात अतिवृष्टी झाली.. याची किंमत शेतकऱ्यांना द्यावी लागेल. जेव्हा पाऊस पडतो त्यावेळी पुढेच संबंध वर्ष शेतीसाठी पूरक असते. जो जिरायत भाग म्हणून ओळखला जातो, तिथे उसाचे पीक घेतले जात आहे. अतिवृष्टीमुळे नुकसान झाले आहे. पण पावसाचा फायदा वर्षभर होईल. यामुळे लोकांचा फायदा होईल असं म्हणायला हरकत नाही, असे पवार म्हणाले.

Back to top button