छोट्या सहलींनाच पसंती ; यंदाही कोकणच अव्वल | पुढारी

छोट्या सहलींनाच पसंती ; यंदाही कोकणच अव्वल

सुनील जगताप : 

पुणे : दिवाळीच्या सुट्यांची चाहूल लागण्यापूर्वीच पर्यटकांनी भटकंतीचे नियोजन केले आहे. 21 ऑक्टोबरपासून सुरू झालेल्या सुट्यांचा मुहूर्त साधून पर्यटक छोट्या सुट्यांसाठी कोकणातील समुद्रकिनारे, महाबळेश्वर, गोव्याला जाणार आहेत. तर, मोठ्या सुट्यांसाठी राजस्थान, केरळ, मध्य प्रदेश आणि अंदमानकडे कूच केली आहे. नोकरी, शिक्षणानिमित्त शहराकडे आलेल्या तरुणांना दिवाळीत आपापल्या गावाला जाण्याची ओढ लागली आहे. तर, पुणेकर सुट्यांमध्ये पर्यटनाला जाण्याची वाट पाहत आहेत. पर्यटकांकडून मिळालेल्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे महाराष्ट्र पर्यटन विकास मंडळाची (एमटीडीसी) कोकणसह सर्व रिसॉर्ट फुल्ल झाली आहेत.

सीझनमुळे खासगी हॉटेलांनाही चांगली मागणी असून, नागरिकांनी दोन महिन्यांपूर्वीच बुकिंग केले आहे. राज्यांतर्गत पर्यटनासाठी या वर्षीही कोकणला विशेषतः समुद्र किनार्‍यावरील पर्यटनस्थळांना सर्वाधिक पसंती मिळाली आहे.  दिवाळी पाडव्यापासून कोकणातील तारकर्ली, वेंगुर्ला, देवबाग, अलिबाग, हरिहरेश्वर, वेळणेश्वर, गणपतीपुळे, दिवेआगर, गुहागर हे समुद्रकिनारे पर्यटकांनी फुलणार आहेत. पर्यटकांच्या आदरातिथ्यासाठी स्थानिक पर्यटन संस्थांनी या वर्षी लहान-मोठे महोत्सवही आयोजित केले आहेत.

समुद्र किनारे, थंड हवेच्या ठिकाणांबरोबरच जंगल पर्यटनाला छोट्या पर्यटकांची पसंती मिळाली आहे. वन्यजीवांबद्दल वाढलेल्या आकर्षणामुळे जंगल सफारीची मागणीही वाढली आहे. व्याघ— प्रकल्पातील ताडोबा, पेंच कान्हा, रणथंबोर, बांधवगड, कान्हा या अभयारण्यांच्या जंगल सफारींचे बुकिंग झालेले आहे. हिवाळा हा हंगाम भटकंतीसाठी सुखकर असल्याने जंगल भटकंतीला चांगला प्रतिसाद मिळतो आहे.

– अनुज खरे, नेचरवॉक आणि सदस्य,  महाराष्ट्र राज्य वन्यजीव सल्लागार मंडळ

पर्यटन टूर्सकडून बुकिंग मोठ्या प्रमाणात होत आहे. या वर्षी दिवाळीनंतर छोट्या सहलींना अधिक मागणी पर्यटकांकडून आहे. जवळपासच्या ठिकाणांना जास्त पसंती दिसून येत आहे. त्याचबरोबर समुद्रकिनारा लाभलेल्या ठिकाणांना जास्त प्रमाणात पर्यटकांकडून मागणी असल्याची माहिती मिळाली आहे.

– सुप्रिया करमरकर, उपसंचालक,  महाराष्ट्र राज्य पर्यटन विभाग

Back to top button