पुणे : बाजारात दीपोत्सवाचा उत्साह | पुढारी

पुणे : बाजारात दीपोत्सवाचा उत्साह

पुणे : पुढारी वृत्तसेवा :  नैराश्य, अंधःकार संपविणार्‍या व प्रत्येकाच्या मनात हर्षोल्हास पेरणार्‍या प्रकाशपर्वास मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला. पुणे शहर, पिंपरी-चिंचवडसह संपूर्ण जिल्ह्यांतील बाजारपेठांमध्ये खरेदीच्या माध्यमातून दीपोत्सवाचा उत्साह शिगेला पोहोचल्याचे चित्र दिसत होते.  दिवाळीनिमित्त खरेदीसाठी बाजारपेठा गर्दीने फुलून गेल्या आहेत. शनिवारी धनत्रयोदशीच्या दिवशी बाजारात प्रचंड गर्दी झाली होती. नागरिकांनी सोने-चांदी, कपड्यासह मनसोक्त खरेदी  केल्याचे दिसले. यानिमित्ताने बाजारपेठेत दररोज लाखोंची उलाढाल होत असल्याचे व्यापारी सूत्रांनी सांगितले. मिणमिणत्या पणत्या आणि आकाशदिवे, रंगीबेरंगी विजेच्या दिव्यांमुळे आसमंत उजळला आहे.

शनिवारी दिवाळीचा दुसरा दिवस असल्याने नागरिकांनी धनत्रयोदशीचा मुहूर्त साधत जोरदार खरेदी केली. पुणे, पिंपरीसह संपूर्ण जिल्ह्यात नागरिकांनी सोने-चांदीसह चारचाकी, दुचाकीची मुहूर्तावर खरेदी केली. तसेच, इलेक्ट्रॉनिक्स वस्तू, कपडा बाजारात प्रचंड गर्दीने पाय ठेवायलाही जागा नव्हती. सायंकाळी नागरिकांनी फटाके फोडून धनत्रयोदशी उत्साहात साजरी केली. शनिवारी गुरूद्वादशी व धनत्रयोदशी एकत्र आल्याने मंदिरात पहाटेपासूनच गर्दी करून दत्तप्रभूंचे दर्शन घेतले. अनेक मंदिरांत शनिवारी गुरूद्वादशीनिमित्त मोठ्या उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. अनेक मंदिरांत शेकडो दिवे लावून नागरिकांनी दत्तप्रभूंचा उत्सव साजरा केला.

दोन वर्षांनंतर तुफान गर्दी…
मागील दोन महिन्यांच्या तुलनेत सोन्याच्या दरात दीड हजारांनी घसरण झाल्याने चोख सोने खरेदी करण्यासाठी ऑनलाईन,
तर दागिन्यांसाठी दुपारपासूनच नागरिकांनी सराफी पेढ्यांमध्ये गर्दी केली होती. या वेळी, गुंतवणूकीच्या दृष्टीने दोन ग्रॅमपासून पाच ग्रॅमपर्यंतच्या चोख सोन्याची मोठ्या प्रमाणात विक्री झाली. तर, दागिन्यांमध्ये आठ ते दहा ग्रॅमच्या दागिन्यांची सर्वाधिक विक्री झाली. यामध्ये, ज्येष्ठांचा चोख, तर तरुणाईचा कमी वजनाचे, हिर्‍याचे दागिने खरेदी करण्याकडे कल राहिल्याचे ‘पीएनजी अ‍ॅन्ड सन्स’चे संचालक अमित मोडक यांनी सांगितले.

Back to top button