पिंपरखेड : पुढारी वृत्तसेवा : शिरूर तालुक्यातील जांबुत येथे फाकटे रस्त्यावर म्हस्केवस्ती येथे बिबट्याला जेरबंद करण्यास अखेर वन विभागाला यश आले आहे. पुजा नरवडे हल्ल्याच्या घटनेनंतर या परिसरात १८ पिंजरे लावण्यात आले होते. दहा दिवसानंतर शनिवारी (दि. २२) पहाटे एका पिंजऱ्यात बिबट्या जेरबंद झाला.
दहा दिवसापूर्वी जोरीमळा येथील १९ वर्षीय पुजा नरवडे या युवतीवर बिबट्याने हल्ला करीत तीला ठार केले होते. यापुर्वी सचिन जोरी यांच्यावर हल्ला करीत त्यांना ठार मारले होते. एक महिन्यात दोन घटना घडल्याने येथील ग्रामस्थ संप्तप्त झाले होते. राज्याचे माजी गृहमंत्री दिलीपराव वळसे पाटील, माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, माजी आमदार पोपटराव गावडे यांनी घटनास्थळी भेट देऊन संबंधित अधिकारी तसेच राज्याच्या वनमंत्र्यांपर्यंत या घटनेची माहिती देऊन वनखात्याने गांभीर्याने दखल घेऊन कारवाई करण्याची मागणी केली होती.
वनविभागाकडून या भागात नरभक्षक बिबट्याला पकडण्यासाठी १८ पिंजरे लावले होते. मात्र बिबट्या पिंजऱ्यांना गुंगारा देत असल्याने वनविभागाकडून शर्थीचे प्रयत्न सुरू होते. अखेर शनिवारी पहाटे म्हस्के वस्ती वरील पिंजऱ्यात बिबट्या जेरबंद करण्यात वन विभागाला यश आले.