सांगवीत चाकू हल्ला करून ‘माॅर्निंग वाॅक’ला निघालेल्या महिलेला लुटले | पुढारी

सांगवीत चाकू हल्ला करून 'माॅर्निंग वाॅक'ला निघालेल्या महिलेला लुटले

सांगवी : पुढारी वृत्तसेवा : बारामती तालुक्यातील सांगवी परिसरातील पाचभाई वस्ती येथे शनिवारी ( दि.२२ ) सकाळी ‘माॅर्निग वाॅक’ला निघालेल्या महिलांवर दुचाकीवरून आलेल्या अज्ञातांनी चाकू हल्ला करून अडीच तोळे सोन्याचे दागिने लंपास केले. वारंवार घडणाऱ्या घटनांमुळे परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

सांगवी परिसरातील पाचभाई वस्ती येथील पुष्पा जनार्दन तावरे व सिंधुबाई धोंडिबा खरात या दोघी सहा वाजण्याच्या सुमारास ‘माॅर्निंग वाॅक’ला सांगवी-पणदरे रस्त्यावरून निघाल्या होत्या. वस्ती पासून तीनशे मीटर अंतरावर सांगवीच्या बाजूने तीन अज्ञात लोक दुचाकीवरून आले. त्यांनी चाकूने हातावर वार केला आणि पुष्पा तावरे यांच्या गळ्यातील अडीच तोळे सोन्याचे दागिने हिसका मारुन घेऊन पणदरेच्या दिशेने निघून गेले. या झटापटीत पुष्पा तावरे यांच्या हातावर गंभीर जखम झाली आहे. तसेच चाकूच्या भितीने पळताना सिंधूबाई खरात या बाजूच्या चारीत पडून हात मोडला आहे.

सांगवी-कांबळेश्वर रस्त्यावर गेल्या काही दिवसांपूर्वीही सकाळी ‘माॅर्निंग वाॅक’ला जाणाऱ्या महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावून नेले होते. ही घटना ताजी असतानाच शनिवारी ( दि.२२ ) सकाळी दुसरी घटना घडल्याने दिवाळीच्या सणाची लगबग सुरू असतानाच आता दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या घटनेबाबत उपविभागीय पोलिस अधिकारी गणेश इंगळे व माळेगाव ठाण्याचे पोलिस निरीक्षक किरण अवचर यांना कळविण्यात आले आहे. वारंवार घडणाऱ्या घटनांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्यासाठी पोलिसांनी ठोस उपाययोजना राबविण्यात येऊन अशा गुन्ह्यांना आळा घालण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

Back to top button