इंदापूरला अंगणवाडी सेविकांचे उपोषण | पुढारी

इंदापूरला अंगणवाडी सेविकांचे उपोषण

इंदापूर : पुढारी वृत्तसेवा  :  बाल विकास प्रकल्प अधिकारी कार्यालय ग्रामीण प्रकल्प नं. 2 हा प्रकल्प पंचायत समिती इंदापूर येथे पूर्ववत सुरू करण्याच्या मागणीसाठी इंदापूर पंचायत समितीसमोर राज्य अंगणवाडी कर्मचारी संघाच्या माध्यमातून अंगणवाडी सेविकांनी बेमुदत उपोषण सुरू केले आहे. बाल विकास प्रकल्प अधिकारी कार्यालय ग्रामीण प्रकल्प नं. 2 हा प्रकल्प अधिकारी व इतर कर्मचारी यांनी ते बारामती येथे वास्तव्यास असल्याने त्यांच्या सोयीसाठी पंचायत समिती इंदापूर येथील कार्यालय भिगवण येथे स्थलांतरित केले आहे. सदरच्या आदेशाविरुद्ध महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघाच्या इंदापूर तालुक्यातील अंगणवाडी सेविकांनी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांना इंदापूरची भौगलिक परिस्थिती सांगितली.

प्रकल्प 2 चे कार्यालय इंदापूर पंचायत समिती येथेचे कसे योग्य आहे हे दाखवून दिले. त्यानुसार जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेच्या ठरावात सदर विषय मंजूर करण्यात आला. त्यानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या आदेशानुसार इंदापूर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी विजयकुमार परिट यांनी प्रकल्प 2 चे प्रकल्प अधिकारी यांना वरिष्ठाच्या आदेशानुसार तत्काळ हे कार्यालय इंदापूर पंचायत समिती येथे स्थांतरित करावे, असा आदेश काढला.

मात्र, वरिष्ठांच्या आदेशाला केराची टोपली दाखविण्यात आल्याचा आरोप आंदोलकांनी केला आहे. आय.सी.डी.एस. प्रकल्प नं. 2 (ग्रामीण) हे कार्यालय पंचायत समिती इंदापूर येथे तत्काळ पूर्ववत सुरू करून त्याचा अहवाल या कार्यालयास विनाविलंब सादर करावा, असा लेखी आदेश संबंधितांना बजावण्यात आला आहे. मात्र, त्यानंतरही कोणत्याही हालचाली न झाल्याने याबाबत वरिष्ठ कार्यालयाकडून सबंधितांवर योग्य ती कारवाई होण्यासाठी इंदापूर पंचायत समिती कार्यालयाकडून अहवाल पाठवला जाईल, असे गटविकास अधिकारी विजयकुमार परीट यांनी सांगितले.

Back to top button