अधिकार्‍यांच्या हलगर्जीपणामुळे ‘वायसीएम’ची बदनामी, स्वतंत्र उपायुक्त नेमण्याची लोकप्रतिनिधी, राजकीय पक्ष, संघटनांची मागणी | पुढारी

अधिकार्‍यांच्या हलगर्जीपणामुळे ‘वायसीएम’ची बदनामी, स्वतंत्र उपायुक्त नेमण्याची लोकप्रतिनिधी, राजकीय पक्ष, संघटनांची मागणी

पिंपरी : महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रुग्णालयाच्या कामकाजात शिस्त यावी. तसेच, रुग्णांना अधिक चांगल्या प्रकारे सेवा व सुविधा उपलब्ध व्हावी, त्यासाठी या रुग्णालयाचे संपूर्ण कामकाज, नियंत्रण व देखरेखीसाठी स्वतंत्र उपायुक्त दर्जाचा अधिकारी नियुक्त करावा, अशी मागणी शहरातील लोकप्रतिनिधी, राजकीय पक्ष तसेच, संघटनांनी केली आहे.

मृतदेहाच्या अदलाबदलीमुळे राज्यात बदनामी

याच रुग्णालयात बुधवारी (दि.19) दोन महिला मृतदेहांची अदलाबदल झाली. या हलगर्जीपणामुळे संबंधितांच्या नातेवाइकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला. संतप्त नागरिकांनी तोडफोड केली. या प्रकारामुळे वायसीएम रुग्णालयासह महापालिकेची राज्यभरात बदनामी झाली आहे. या प्रकारास जबाबदार असलेल्या अधिकारी व कर्मचार्‍यांवर कठोर कारवाई करावी. संपूर्ण रुग्णालयावर नियंत्रण ठेवण्यासाठी सक्षम असा उपायुक्त दर्जाचा अधिकारी नियुक्त करावा, अशी मागणी लोकप्रतिनिधींनी केली आहे.

सेवा, संस्था, प्रशासन असे वेगवेगळे विभाग करा

वायसीएम रुग्णालयातील मृतदेह अदलाबदलाच्या प्रकारामुळे रुग्णालयातील भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला आहे. हा प्रकार निषेधार्ह आहे. रुग्णालयाच्या आस्थापनेमध्ये बदल करण्यात यावा. रुग्णालय सेवा, पदव्युत्तर शिक्षण संस्था, प्रशासन व निविदाविषयक कामकाज असे वेगवेगळे विभाग करावेत. रुग्णालय सेवा विभाग वैद्यकीय अधीक्षकांकडे, पदव्युत्तर शिक्षण संस्थेचा कारभार रुग्णालय अधिष्ठाता यांच्याकडे आणि प्रशासन व निविदाविषयक कामकाज करणे आणि रुग्णालयातील संपूर्ण जबादारी उपायुक्त दर्जाच्या अधिकार्‍यांकडे देण्यात आली. उपायुक्त हे अतिरिक्त आयुक्त व आयुक्त यांच्या नियंत्रणाखाली काम करेल. त्यामुळे रुग्णालयास शिस्त लागून रुग्णांना चांगली सेवा मिळेल, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अण्णा बनसोडे यांनी केली आहे.

आयुक्तांना दिले निवेदन

त्यासंदर्भात आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांना निवेदन देण्यात आले आहेत. वायसीएम रुग्णालयात पुणे जिल्ह्यासह राज्यभरातून रुग्ण उपचारासाठी दाखल होतात. रुग्णालयात चांगल्या तसेच, माफक दरात उपचार मिळत असल्याने रुग्णांची संख्या मोठी असते. तसेच, कोरोना काळात सर्वात कमी मृत्यूदर असल्याबद्दल रुग्णालयाचा गौरवही झाला आहे.

मृतदेह अदलाबदलीचा प्रकार रुग्णालयातील चुकीच्या पद्धतीच्या कामकाजामुळे घडला आहे. ही बाब माणुसकीला काळीमा फासणारी आहे. या घटनेचा निषेध आहे. प्रशासनाकडून नातेवाइकांची हेळसांड करण्यात आली. मृतदेहांची अदलाबदल कशी झाली, याचा तपास करण्यात यावा. त्यामागे प्रशासकीय षडयंत्र असल्याचा संशय बळावत आहे. या प्रकरणाची चौकशी करण्यात यावी. दोषींवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी. अन्यथा पालिकेच्या विरोधात रस्त्यावर उतरावे लागेल.
– सचिन चिखले, शहराध्यक्ष, मनसे

Back to top button