

पुणे : पुढारी वृत्तसेवा: पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्यात उपस्थित उद्योजकांकडून उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या. त्यात 356 उमेदवारांची प्राथमिक निवड करण्यात आली. जिल्हा कौशल्यविकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र आणि एसएनडीटी गृहविज्ञान महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने हा मेळावा आयोजित केला होता. या वेळी कौशल्यविकास, रोजगार व उद्योजकता विभागाच्या विभागीय उपायुक्त अनुपमा पवार, एसएनडीटी कॉलेज ऑफ होम सायन्सच्या प्राचार्या डॉ. मुक्तजा मठकरी, जिल्हा कौशल्यविकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहायक आयुक्त कविता जावळे आदी उपस्थित होते.
या वेळी उपायुक्त पवार म्हणाल्या, 'प्रदीर्घ काळानंतर आयोजित प्रत्यक्ष रोजगार मेळाव्याला उद्योजकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला. यापुढेही जास्तीत जास्त उद्योजकांनी या मेळाव्यात सहभागी व्हावे.' या रोजगार मेळाव्यास केंद्र शासनाच्या कौशल्यविकास व उद्योजकता विभागाचे उपसंचालक डॉ. अभिषेक मीना यांनीही भेट देऊन उत्कृष्ट संयोजनाबद्दल विभागाचे कौतुक केले. प्राचार्या डॉ. मठकरी यांनीही मनोगत व्यक्त केले.
पुणे जिल्ह्यातील 33 उद्योगांचा सहभाग
या रोजगार मेळाव्यासाठी पुणे शहर, पिंपरी-चिंचवड, हडपसर व शिंदेवाडी या औद्योगिक परिसरातील 29 उद्योजकांनी त्यांच्याकडील विविध प्रकारची एकूण 5 हजार 89 रिक्त पदे कळवली होती. तथापि, 33 उद्योजक प्रत्यक्षात सहभागी झाले. या मेळाव्यामध्ये एकूण 642 बेरोजगार युवक-युवतींनी प्रत्यक्ष मुलाखत प्रक्रियेत सहभाग नोंदविला. उपस्थित उद्योजकांनी रोजगार मेळाव्याच्या ठिकाणी उमेदवारांच्या मुलाखती घेऊन त्यातून एकूण 356 इतक्या उमेदवारांची प्राथमिक निवड करण्यात आली.