तुम्ही फक्त आमच्या राज्यात या, एका महिन्यात जागा, मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांचे महाराष्ट्रातील उद्योजकांना आवाहन | पुढारी

तुम्ही फक्त आमच्या राज्यात या, एका महिन्यात जागा, मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांचे महाराष्ट्रातील उद्योजकांना आवाहन

पुणे, पुढारी वृत्तसेवा: सिंचन गुणवत्ता बरोबर खनिज साठ्याने संपन्न असलेल्या मध्यप्रदेशात उद्योगपती येतील तर एका महिन्यात जागा देण्याची हमी देतो. कुशल कामगार देण्याची सोय इंदूर, जबलपूर, भोपाळ सारख्या मोठ्या शहरात सोय केली असून ‘ उद्योगपतीचं हब ‘ म्हणून मध्यप्रदेशाची ओळख होत असल्याचे मत मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी पुण्यात व्यक्त केले. मध्य प्रदेशातील इंदोरमध्ये ११ व १२ जानेवारी २०२३ रोजी होणाऱ्या  ‘ग्लोबल इन्वेस्टर्स समिट’ साठी पुण्यातील उद्योजकांना येण्याचे आवाहन करण्यासाठी चौहान शुक्रवारी पुण्यात आले होते, त्यावेळी ते बोलत होते.

मध्य प्रदेशातील उद्योग संधी बाबत त्यांनी विस्तृत चर्चा करून जे मागाल ते त्वरित देतो, असे म्हणत उद्योजकांना आपलेसे करण्यात यश मिळवले. मध्य प्रदेशात विदेशी उद्योजक मोठ्या संख्येने येत असून पुण्यातील उद्योजकांना देशाशी जोडणे सोपे होणार आहे. पुण्याची नवीन ओळख निर्माण झालेली आहे. भारतीय कंपन्यांबरोबर विदेशी कंपन्यांचे देखील पुण्यात काही उद्योग आहेत. मध्यप्रदेशात उद्योजकाने त्यांचा उद्योग केला तर त्यांची थेट लिंक देशभरातील उद्योगांशी होणार आहे. याकरिता महाराष्ट्रातील उद्योजकांनी मध्यप्रदेश सारख्या राज्याची निवड केल्यास त्यांना लागणाऱ्या कुशल कामगारांची व त्यासाठी लागणाऱ्या मोठ्या शैक्षणिक संस्था देखील उभारण्याचे काम सुरू झालेले आहे.

उद्योजकाने त्यांचा प्रस्ताव दाखल करताच सरकार त्यांना एक महिन्याच्या आत जागेसह सर्व करार करून देण्याची सोय करणार आहे. कोणत्याही कामासाठी टेबल फाईल घेऊन फिरण्याची गरज नाही. फक्त इंटरेस्ट दाखवा आणि सर्व पूर्तता करतो, असे वचनही चौहान यांनी उद्योगांना दिले.

स्किल लेबर तयार

मध्यप्रदेशात स्किल लेबर तयार करणे गरजेचे आहे. शिक्षणाचे माहेरघर म्हणून पुण्याची जशी ओळख आहे. तशीच ओळख आता मध्य प्रदेशाची ही झालेली आहे. आमच्या सरकारने उद्योजकांना लागणारा सर्व कुशल कामगार व त्यासाठी लागणारी सर्व शैक्षणिक संस्था उभ्या केल्या आहेत. यामुळे कमी पैशात उद्योजकांना कुशल कामगार मिळणार आहे.

मध्य प्रदेश राज्याला खजिन्याचे शहर म्हणून देखील ओळखले जात. संगमरवर पासून खनिज संपन्न व पर्यटनाचे शहर असलेल्या या राज्यात उद्योजकाने एखादा उद्योग उभारला तर पर्यायाने त्याचे दहा उद्योग उभे राहू शकतात. लवकर विकास आणि प्रगती हवी असेल तर उद्योजकांनी यावं, असे आवाहन चौहान यांनी केले.

उद्योजकांनी गुंतवणूक करण्याची तयारी दाखवल्यास एका महिन्यात उद्योग उभारणी कशी होईल व त्यासाठी लागणारी जमीन ताब्यात देण्याची हमी आजच देतो. उद्योग सुरू केल्यावर उद्योजकाला काही अडचण आल्यास ट्वेंटी फोर बाय सेवन हा मुख्यमंत्री तुमच्या प्रश्नासाठी हजर आहे. आठवड्याच्या पहिल्या सोमवारी उद्योजकांशी भेटण्याचा व त्यांना ऐकून घेण्याचा माझा प्रोग्राम आहे. उद्योग समितीमध्ये सहभागी होण्या अगोदरही काही उद्योजकांनी प्रस्ताव दिल्यास मी तातडीने मंजूर करून उद्योग कसा सुरू होईल याची तयारी देखील करून देईल, असे चव्हाण यांनी उद्योजकाना वचन दिले.

Back to top button