गुजरात येथून सुटका करून महिला थेट येरवडा पोलिस ठाण्यात, अपहरण करून बलात्कार केल्याचा प्रकार | पुढारी

गुजरात येथून सुटका करून महिला थेट येरवडा पोलिस ठाण्यात, अपहरण करून बलात्कार केल्याचा प्रकार

पुणे : पुढारी वृत्तसेवा : इंस्टाग्रामवर झालेल्या ओळखीतून तरूणीचे अपहरण करून तिला गुजरात येथे नेऊन तिच्यावर बलात्कार करणार्‍या व तिला तेथे डांबून ठेवणार्‍या एकावर येरवडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. गुजरात येथून आरोपीच्या तावडीतून सुटका केल्यानंतर तिने थेट येरवडा पोलिस ठाणे गाठून याबाबतची तक्रार दिली. याप्रकरणी झाकीर ईस्माईल झवेरीवाला (35, रा. गुजरात) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पिडीत महिला मुळची नेपाळ येथील रहिवासी असून सध्यात तीन पुण्यातील ढोले पाटील रोड येथे राहते. नोव्हेंबर 2021 दरम्यान तिची ओळख इन्स्ट्राग्रामच्या माध्यमातून गुजरात येथील झाकीर याच्याशी झाली होती. त्याने तिच्याशी ओळख वाढवून पहिले लग्न झाले असताना तिला लग्नाची मागणी घातली. यानंतर तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. याच दरम्यान त्याने तिला गुजरात येथे नेले. तेथे तिला दुसरे लग्न झाल्याचे समजले.

त्याने तिला गुजरात येथील घरात डांबून ठेवून तिला अ‍ॅसीड फेकून जीवे ठार मारण्याची धमकी दिली. याच दरम्यान झाकीर हा त्याच्या पहिल्या पत्नीला भेटायला गेल्यानंतर तरूणीने डांबून ठेवलेल्या ठिकाणाहून कशी बशी स्वतःची सुटका करून पुणे गाठले. पुणे गाठल्यानंतर तिला झाकीर याने वेगवेगळ्या नंबरवरून फोन करून, ‘तू कोठेही गेली तरी मी तुला सोडणार नाही अशी त्याने तिला धमकी दिली.’ त्याच्या वारंवारच्या त्रासाला कंटाळून तिने थेट येरवडा पोलिस ठाणे गाठून तिच्यावर झालेल्या अत्याचाराचा पाढा  वाचल्यानंतर याप्रकरणी पोलिसांनी महिलेला दिलासा देत गंभीर कलमांअंतर्गत संबंधित आरोपीवर गुन्हा दाखल केला आहे.

 

संशयीत आरोपीने लग्नाचे अमिष दाखवून तिचे अपहरण करून तिला गुजरात येथे नेले होते. तिच्यावर लैंगिक अत्याचाराचा प्रकारही या दरम्यान घडल्याचे तिने सांगितले असून तिला गुजरात येथे डांबून ठेवण्यात आल्यानंतर तीने तिची कशीबशी सुटका करून घेत येरवडा पोलिस ठाणे गाठले. याबाबत गुन्हा दाखल झाला आहे.
                              – सुरेखा गाताडे, पोलिस उपनिरीक्षक, येरवडा पोलिस ठाणे.

Back to top button