पुणे : टीईटीतील संशयितांनाही वेतन! | पुढारी

पुणे : टीईटीतील संशयितांनाही वेतन!

पुणे : पुढारी वृत्तसेवा :  शिक्षक पात्रता परीक्षेत (टीईटी) गैरप्रकार केलेल्या कार्यरत शिक्षकांचे वेतन थांबवण्याची कारवाई करण्यात आली होती; मात्र वेतन स्थगित केलेल्या शिक्षकांना उच्च न्यायालयाच्या अंतरिम आदेशानुसार दिवाळीपूर्वी वेतन देण्याचे निर्देश प्राथमिक शिक्षण संचालकांनी दिले आहेत. राज्य परीक्षा परिषदेतर्फे घेण्यात आलेल्या टीईटीमध्ये गैरप्रकार झाल्याचे पोलिस तपासात उघड झाले. त्या अनुषंगाने गुन्हा दाखल करण्यात आला. टीईटीमध्ये गैरप्रकार केलेल्या 7 हजार 874 उमेदवारांची यादी परीक्षा परिषदेने जाहीर केली. त्यात सध्या कार्यरत असलेल्या शिक्षकांचाही समावेश होता. त्यामुळे संबंधित शिक्षकांवर कारवाई म्हणून त्यांचे शालार्थ आयडी रद्द करून वेतन थांबवण्याचे आदेश देण्यात आले. या कारवाईविरोधात संबंधित शिक्षकांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. या याचिकेच्या अनुषंगाने उच्च न्यायालयाने अंतरिम आदेश दिला. त्यामुळे एका अर्थाने टीईटीत गैरप्रकार केलेल्या शिक्षकांवरील कारवाईला स्थगिती मिळाल्याचे दिसून येत आहे.

प्राथमिक शिक्षण संचालक महेश पालकर यांनी विभागीय उपसंचालकांना निर्देश दिले असून, उच्च न्यायालयाच्या अंतरिम आदेशानुसार वेतन स्थगित केलेल्या कर्मचार्‍यांचे वेतन देण्याचे निर्देश आहेत. न्यायालयाच्या आदेशाशिवाय वेतनवाढ मंजूर करता येणार नाही. पुढील आदेशापर्यंत याचिकेतील कर्मचार्‍यांचे शालार्थ आयडी पूर्ववत उपलब्ध करून देण्यात येत आहेत. त्यानुसार संबंधित कर्मचार्‍यांचे वेतन दिवाळीपूर्वी देण्याची कार्यवाही करावी, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

Back to top button