पुणे : नऊ लाख लाभार्थ्यांचे डोळे ‘दिवाळी किट’कडे ; पुरवठा न झाल्याने जिल्हा प्रशासन हतबल | पुढारी

पुणे : नऊ लाख लाभार्थ्यांचे डोळे ‘दिवाळी किट’कडे ; पुरवठा न झाल्याने जिल्हा प्रशासन हतबल

पुणे : पुढारी वृत्तसेवा : अंत्योदय अन्न योजना, प्राधान्य शिधापत्रिकाधारकांना दिवाळी किट अत्यल्प दरात देण्याची घोषणा करण्यात आली. मात्र, किटमधील धान्य, पामतेलाचा पुरवठा कसा व कुठून होणार, याचे नियोजन नसल्याने दिवाळी सुरू होऊनही प्रत्यक्षात किट वाटपाला सुरुवातच झालेली नाही. त्यामुळे शहर आणि जिल्ह्यातील नऊ लाख 14 हजार लाभार्थ्यांना दिवाळी किट कसे वाटणार, असा प्रश्न आहे, तर दुसरीकडे पुरवठादारांपुढे प्रशासनही हतबल झाले आहे.  महागाईच्या काळात कमी किमतीत वस्तू मिळणार असल्याने पात्र लाभार्थ्यांचे डोळे स्वस्त धान्य दुकानाकडे लागले आहेत.

पुणे शहर आणि जिल्ह्यात 9 लाख 16 हजार 371 कुटुंब पात्र आहेत. त्याप्रमाणात शासनाकडे मागणी करण्यात आली. दिवाळी किटमधील जिन्नस (रवा, साखर, हरभराडाळ, पामतेल) व पिशव्या पुरविण्याचे कंत्राट शासनाने वेगवेगळ्या कंपन्यांना दिले आहे. यामुळे काही स्वस्त दुकानांत या जिनसांपैकी काही वस्तू पोचल्या, काही पोचल्या नाहीत. दिवाळी शुक्रवारपासून (दि.21) सुरू झाली असून, किट कधी मिळणार ? त्याचे लाडू, चकल्या, करंज्या, चिवडा, शंकरपाळे, अनारसे आदी फराळाचे पदार्थ कधी करायचे ? असा सवाल उपस्थित केला जात आहे.  आपली दिवाळी गोड होणार, अशी अपेक्षा असलेले पात्र लाभार्थी स्वस्त धान्य दुकानात विचारणा करत आहेत. मात्र, दुकानातच किटचा पुरवठा झाला नसल्याचे उत्तर मिळत असल्याने लाभार्थी नाराज होत आहेत. लाभार्थ्यांना उत्तर देऊन दुकानदारही हतबल होत आहेत. शंभर रुपयांत किट मिळणार असे सांगण्यात आल्याने नियमित धान्याची उचल होत नसल्याचे सांगण्यात आले.

छापील बॅगेचा आग्रह
रवा, साखर, हरभराडाळ, पामतेल या चार वस्तू एका बॅगेमध्ये भरून देण्याची सूचना करण्यात आली. त्यासाठी बॅग पुरवण्याचे काम देण्यात आले. मात्र, वेळेत बॅगही उपलब्ध झाल्या नाहीत. त्यामुळे काही ठिकाणी किट उपलब्ध होऊनही बॅग नसल्यामुळे किटचे वाटप करण्यात आलेले नाही.

शहरात पुरवठ्याकडे दुर्लक्ष
ग्रामीण भागात किटचा पुरवठा झाला असून, काही तालुक्यांत अद्यापही एक- दोन वस्तू पोहोचलेल्या नाहीत. त्यामुळे वाटपाला सुरुवात झालेली नाही. शुक्रवारी सकाळपासून किटचे सुरळीत वाटप होईल, असे सांगण्यात आले. मात्र, दुसरीकडे शहरात 20 टक्के दुकानांमध्ये काही वस्तूंचा पुरवठा झाला आहे, तर अन्य दुकानांत एकही वस्तू पोहोचली नाही.

Back to top button