पिंपरी: एसटीच्या भाडेवाढीमुळे प्रवासी नाराज | पुढारी

पिंपरी: एसटीच्या भाडेवाढीमुळे प्रवासी नाराज

पिंपरी, पुढारी वृत्तसेवा: पिंपरी-चिंचवड शहरासह संपूर्ण राज्यात दिवाळीनिमित्त एसटीची 10 टक्के हंगामी भाडेवाढ मंजूर झाल्याने शुक्रवार (दि. 21) पासून ही भाडेवाढ लागू होणार आहे. या भाडेवाढीमुळे प्रवाशांनी संताप व्यक्त केला आहे. एसटीच्या साधी, शयन, आराम, निमआराम व वातानुकूलित शिवाई व शिवशाही या सर्व गाड्यांना ही भाडेवाढ लागू आहे.

दिवाळी सण हा आपल्या गावी साजरा करण्यासाठी राज्याच्या कानाकोपर्‍यांमध्ये तसेच राज्याबाहेर जाणार्‍या प्रवाशांची संख्या अधिक असतेे. महिन्याभरापूर्वीच खासगी वाहनांनी प्रवाशांकडून अव्वाच्या- सव्वा दर आकारून तिकीट बुक केले आहेत. रेल्वेचे तिकीट आता उपलब्धदेखील होत नाहीत. राज्य मार्ग परिवहन महामंडळाने ज्यादा गाड्यांची सोय केली आहे. 21 ऑक्टोंबर पूर्वी नागरिकांनी आरक्षित केलेल्या जागांसाठी 10 टक्के भाडेवाढीची रक्कम गाडीत बसल्यावर आकारणी केली जाईल. ही भाडेवाढ दिवाळी हंगामापुरती आहे. प्रवाशांनी खासगी बसने अवाजवी दर देऊन प्रवास करणे टाळून त्याऐवजी एसटीने प्रवास करावा, असे आवाहन विभागाच्या वतीने करण्यात येत आहे.

एसटीने हंगामी भाडेवाढ केली आहे. ती खासगी वाहनांच्या तुलनेत कमी आहे; मात्र अगोदरच महागाई झालीआहे. त्यामध्ये एसटीने भाडेवाढ केली. नागरिकांना दिलासा देणे सरकारचे काम आहे; परंतु असे निर्णय सर्वसामान्यांच्या हिताचे नाहीत.
– श्रेया शिंदे, आकुर्डी.

खासगी वाहनांच्या तुलनेत एसटीची भाडेवाढ कमीच आहे. सेवांच्या तुलनेत मात्र एसटी कमी पडत आहे. नागपूरसारख्या ठिकाणी लांब अंतराचा प्रवास एसटीने बसूनच करावा लागतो. एवढा लांबचा प्रवास बसून करणे अवघड आहे. थोडे आणखी तिकीट वाढवून स्लीपर बसचीही सोय एसटी महामंडळाने करावी. म्हणजे प्रवाशी खासगी वाहनांचा विचारच करणार नाहीत.
– वैभव वानखडे, महाविद्यालयीन तरुण, रावेत.

दिवाळी सणासाठी गावी जाणार होतो. मात्र रेल्वेचे आरक्षण फूल झाल्याने उपलब्ध होत नाही; तसेच खासगी प्रवासी कंपन्यांनीही दर वाढवले आहेत. यातच एसटीनेही भाडेवाढ केली आहे. त्यामुळे दिवाळी हंगाम संपल्यावरच आम्ही गावी जाणार आहोत.
– विजय पंडित, पिंपरी.

एसटीची भाडेवाढ ही इतर खासगी सेवांच्या तुलनेत कमी आहे. तसेच एसटी महामंडळाने ज्यादा गाड्यांची सोयदेखील करून दिली आहे. त्यामुळे एसटीचे विभागाचे आभार; मात्र बस सोडण्याच्या ठिकाणी योग्य नियोजन आवश्यक आहे.
– सोनल नागपुरे, महाविद्यालयीन तरुणी, निगडी.

डिझेलच्या दरामध्ये सतत वाढ होत आहे. तसेच प्रवाशांसाठी जादा बसेसही सोडण्यात आल्या आहेत. खासगी वाहतुकीच्या तुलनेत ही वाढ अतिशय कमी आहे. त्यामुळे प्रवाशांनी सुखकर, सोईचा आणि सुरक्षेच्या दृष्टीने एसटीनेच प्रवास करण्याला प्राधान्य द्यावे.
– स्वाती बांद्रे, आगार व्यवस्थापक, पिं. चिं. शहर.

Back to top button