पिंपरी: रुग्णालयाची हलगर्जी अन् भावनांचा चुराडा | पुढारी

पिंपरी: रुग्णालयाची हलगर्जी अन् भावनांचा चुराडा

संतोष शिंदे

पिंपरी : कोणी आपल्या एकुलत्या एक बहिणीला शेवटचे पाहण्यासाठी शेकडो मैलांचे अंतर पार करून शहरात आले. तर, कोणी मावशी, काकू, सासूचा चेहरा पाहण्यासाठी डोळे पाणावून बसले होते. एक तरुण आपली आई समजून दुसर्‍याच महिलेच्या मृताशेजारी धाय मोकलून रडत होता. तर, दुसरीकडे हरवलेली आई शोधण्यासाठी एक जण रक्तबंबाळ हातांनी तोडफोड करीत होता. महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयातील कर्मचार्‍यांच्या एका चुकीमुळे बुधवारी (दि. 19) मृताच्या नातेवाइकांच्या भावनांचा अक्षरशः चुराडा झाल्याचे पाहावयास मिळाले.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, दापोडी येथील स्नेहलता गायकवाड (61) आणि थेरगाव येथील मीना गाडे (57) यांचा मृत्यू झाला. दरम्यान, रुग्णालयाच्या गलथान कारभारामुळे दोघींच्या मृतदेहाची अदलाबदल झाली. वरवर किरकोळ वाटणारी ही चूक अनेकांच्या भावनांना हात घालून गेली. स्नेहलता ह्यांना दीपक शिंदे आणि धर्मेंद्र शिंदे हे दोन भाऊ आहेत. एकुलत्या एक बहिणीचा अपघात झाल्याचे समजताच दोघेही अहमदाबाद, गुजरात येथून घाईगडबडीत निघाले. प्रवासात असताना त्यांना बहीण गेल्याचे समजले. आता बहिणीचे शेवटचे दर्शन घ्यायचे; तसेच तिच्या मुलांना आधार देण्यासाठी दोघे भाऊ सकाळी शहरात दाखल झाले. मृतदेह राहत्या घरी दापोडी येथे आणणार असल्याने सर्वजण रस्त्याकडे डोळे लावून बसले होते; मात्र रुग्णालयाने घोळ घातला.

स्नेहलता यांचा मृतदेह सकाळीच मीना यांचा मुलगा गणेश याच्या ताब्यात दिला. आईचा चेहरा बदलल्याचे पाहूनही त्याने रुग्णलयाच्या सांगण्यावर विश्वास ठेवला. मागील काही वर्षांपासून दुर्धर आजाराशी झुंजणारी आई गमावल्याचे दुःख त्याला आतून खात होते. आई समजून गणेश स्नेहलता यांच्या अंत्यविधीला धाय मोकलून रडला. मित्रांना आईच्या आठवणी सांगून त्याने अनेकांचे हृदयात पिळवटून टाकले. मीना यांचे जवळचे नातेवाईक देखील स्मशानभूमीत आले होते. त्यांचेही डोळे पाणावले होते. प्रत्यक्षात मात्र मीना यांचा मृतदेह रुग्णालयातच पडून होता. तर, स्नेहलता यांचा देह जवळचे कोणीही नसताना अनंतात विलीन होत होता.

दुपारनंतर रुग्णालयाच्या ही चूक लक्षात आली. रुग्णालयाने मृतदेह अदलाबदल झाल्याची कबुली दिली अन् स्नेहलता यांच्या नातेवाइकांनी एकच आक्रोश केला. यातच स्नेहलता यांच्या देहावर दुसरेच कोणीतरी अंत्यसंस्कार केल्याचे ऐकून रोहन आणि युवराज यांनी टाहो फोडला. ‘कुठे शोधू माझ्या आईला…!, अशी आरोळी ठोकून युवराज याने सगळ्यांच्या हृदयाचा ठोका चुकवला. रोहन देखील आक्रमक होऊन सरते शेवटी हतबल झाला. अशा प्रकारे रुग्णालयाची हलगर्जी अन भावनांचा चुराडा झाल्याचे पहावयास मिळाले.

आईच्या अस्थी पाहून फाटले आभाळ

स्नेहलता यांच्या मृतदेहावर गाडे कुटुंबीयांनी अंत्यसंस्कार केले. ज्या वेळी त्यांची दोन्ही मुले स्मशानभूमीत पोहोचली त्या वेळी समोर आईच्या अस्थी पाहून त्यांना आभाळ फाटल्याचे दुःख झाले. शेवटी कशीबशी समजूत घालून नातेवाइकांनी त्यांना शांत केले. अस्थींनाच मृतदेह समजून मुलांनी पुढील विधी पूर्ण केला. त्या वेळी स्मशानभूमीत पोलिस फौजफाटा तैनात करण्यात आला होता.

Back to top button