बारामती : पुरात वाहून गेलेला तो युवक सुखरुप | पुढारी

बारामती : पुरात वाहून गेलेला तो युवक सुखरुप

बारामती : पुढारी वृत्तसेवा: मुर्टी (ता. बारामती) येथील जाधववस्ती शेजारून वाहणाऱ्या ओढ्याच्या पाण्यात गुरुवारी (दि. २०) रात्री दोनच्या सुमारास एक युवक दुचाकीसह वाहून गेला होता. हा युवक सुखरुप असल्याची माहिती वडगाव निंबाळकर पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक सोमनाथ लांडे यांनी दिली. सागर अरविंद पाटील (वय २९, रा. सोनकिरे, ता. कडेगाव, जि. सांगली) असे या युवकाचे नाव आहे. पोलिसांनी त्याची दुचाकी शोधून काढली.

दुचाकी क्रमांकाच्या आधारे दुचाकी मालकाचे नाव निष्पन्न करण्यात आले. संपर्क क्रमांक मिळवत पोलिसांनी अधिक चौकशी केली असता तो रांजनगाव येथे पत्नीकडे सुखरुप पोहोचला असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर सर्वांनीच सुटकेचा निश्वास टाकला.

मोरगाव-मुर्टी रस्त्यावर सानिका हाॅटेलजवळ ही घटना घडली होती. पुराच्या पाण्यात दुचाकीसह एक युवक वाहून जात असल्याचे या हाॅटेलचे मॅनेजर इब्राहीम बागवान यांनी पाहिले. त्यांनी तात्काळ ग्रामस्थांना या घटनेची माहिती दिली. पोलिसांना खबर देण्यात आली. रात्रीपासूनच पोलिसांनी शोध कार्य हाती घेतले होते. दुपारी एक वाजेपर्यंत शोध कार्य सुरु होते. घटनास्थळी बारामतीचे प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे, तहसीलदार विजय पाटील, गटविकास अधिकारी अनिल बागल, सहाय्यक पोलिस निरीक्षक सोमनाथ लांडे, उपनिरीक्षक योगेश शेलार, हवालदार अमोल भोसले, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष संभाजी होळकर आदींनी भेट दिली.

शोध कार्य सुरु असताना ओढ्यातील पाण्यात राजाराम बालगुडे व ननू तांबे यांना दुचाकी सापडली. ती बाहेर काढण्यात आली. दुचाकी क्रमांकावरून मालकाचा शोध घेण्यात आला. सांगली जिल्ह्यात संपर्क केला असता पाटील यांच्या नातेवाईकांनी सागर हा ओढ्याच्या पुरातून पोहून बाहेर येत रांजणगाव येथे पत्नीकडे पोहोचला असल्याचे सांगितले. त्यानंतर शोध कार्य थांबविण्यात आले.

सागर पाटील हे रांजणगाव गणपती येथे पत्नीला आणण्यासाठी चालले होते. पुराच्या पाण्यात ते दुचाकीसह वाहून गेले. परंतु त्यांना पोहता येत असल्याने पुढे गेल्यावर एका झाडाच्या आधाराने ते पाण्याबाहेर आले. घाबरलेल्या अवस्थेत ते होते. त्यांनी एका गाडीला हात करून मोरगाव गाठले. तेथून रांजणगाव येथे ते पत्नीकडे गेल्याचे सपोनि सोमनाथ लांडे यांनी सांगितले.

Back to top button