अधिक नफ्याचा मोह पडला महागात ! झाली २ कोटी,५७ लाख,९४ हजार रुपयांची फसवणूक | पुढारी

अधिक नफ्याचा मोह पडला महागात ! झाली २ कोटी,५७ लाख,९४ हजार रुपयांची फसवणूक

राजगुरूनगर : पुढारी वृत्तसेवा : शेअर्सच्या नावाखाली पैसे घेऊन अधिकचा नफा मिळवून देण्याच्या बहाण्याने २ कोटी,५७ लाख,९४ हजार रुपयांची फसवणूक झाल्याचा प्रकार घडला असून त्याप्रकरणी दोघांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. राहुल दिलीप जायभाय (वय ३५, रा. गोविंद गार्डन, पिंपळे सौदागर, पुणे) व राहुल गुलाबसिंग जाखड (रा.सोमटणे, तळेगाव दाभाडे) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या कंपनी चालकांची नावे आहेत. त्यांच्या विरोधात अमोल बाळासाहेब राजगुरव यांनी तक्रार नोंदवली आहे. आरोपी व तक्रारदार एकमेकांना ओळखणारे आहेत. त्यांच्यात शेअर्स खरेदी देण्याघेण्याचा व्यवहार २० मे २०२० ते ८ फेब्रुवारी२०२१ या कालावधीत झाला. आरोपींनी वेळोवेळी ही रक्कम फिर्यादीकडून घेतली. मात्र परतावा देताना टाळाटाळ सुरू केली.

संगनमत करून फिर्यादी व त्यांच्या नातेवाईकांना विश्वासात घेऊन सांगितले की, त्यांच्या कंपन्या दुबई देशातील क्रुड ऑईल कंपन्यांच्या शेअर्स खरेदी करतात. त्याद्वारे मोठया प्रमाणात नफा मिळवत आहे. त्यासाठी तुम्ही आमच्या चार कंपन्या मध्ये या कंपन्यांमध्ये ठेवी म्हणून गुंतवणूक करा. त्याबदल्यात आम्ही तुम्हाला प्रतिमहा ३ ते ७ टक्के परतावा (ज्या प्रमाणात आम्हाला पुढे नफा होईल त्या प्रमाणात ) देऊ असे अमिष दाखवले. त्याप्रमाणे आरोपींनी बँक खात्यामार्फत, त्यांच्या कंपन्यांच्या बँक खात्यावर वेळोवेळी भरणा करण्यास भाग पाडले.

मात्र पुढे रक्कम घेवून, गुंतवणूक केलेली रक्कम व परताव्याची रक्कम परत न देता, फिर्यादीने गुंतवणूक केलेल्या रक्कमेच्या परताव्याची मागणी केली. मात्र पैसे परत करण्याऐवजी आरोपींनी त्रयस्थ व्यक्तीमार्फत आम्ही तुमच्याविरूद्ध फसवणुकीची तक्रार दाखल करणार आहे. तुमच्या नावाने पत्र लिहून आत्महत्या करणार आहे. अशी धमकी दिली. फिर्यादी तसेच त्यांच्या नातेवाईकांची एकूण २ कोटी,५७ लाख,९४ हजार रूपयांची फसवणूक करून विश्वासघात केला. म्हणून तक्रारदार अमोल राजगुरव यांनी आरोपींविरुद्ध खेड पोलीस ठाण्यात तक्रार दिली. खेड पोलिसांनी आरोपींविरोधात संगनमताने फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल केला असल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक भारत भोसले यांनी दिली.

Back to top button