

भवानीनगर, पुढारी वृत्तसेवा: सतत सुरू असलेल्या पावसामुळे श्री छत्रपती कारखान्याच्या गाळप हंगामावर परिणाम झाला आहे. उसाच्या फडांमध्ये पाणी साचल्याने ऊस तोडणी करताना मजुरांना कसरत करावी लागत आहे. छत्रपती साखर कारखान्याच्या प्रत्यक्ष ऊस गाळप हंगामाला 16 ऑक्टोबरपासून सुरुवात झाली आहे. 16 ऑक्टोबर रोजी कारखान्याच्या शेतकी विभागाने ऊस वाहतूक कंत्राटदारांना उसाच्या तोडी दिल्या आहेत. सतत होत असलेल्या पावसामुळे उसाच्या फडांमध्ये चिखल झाला. काही ठिकाणी पाणीदेखील साचले आहे. ऊस तोडणी करणार्या मजुरांना चिखलामध्ये तोडणी करावी लागत आहे.
चिखलामुळे वाहने फसू नयेत म्हणून कारखान्याने सुरुवातीला रस्त्यालगत असणार्या उसाच्या फडांना तोडी देण्यास सुरुवात केली आहे. फडांमध्ये चिखल असल्यामुळे उसाच्या मोळ्या फडातून बाहेर काढताना व ट्रेलरमध्ये भरताना ऊस तोडणी करणार्या मजुरांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. कच्च्या रस्त्याला असणार्या उसाच्या फडामधून उसाने भरलेली वाहने बाहेर काढताना ट्रॅक्टरची मदत घ्यावी लागते. पावसामुळे कारखान्याच्या ऊस तोडणी कार्यक्रमावर परिणाम झाला आहे
बैलगाडीवर ऊस तोडणी करणार्या मजुरांना जनावरांचे बाजार बंद असल्यामुळे बैल जोड्या जादा पैसे देऊन विकत घ्याव्या लागत आहेत. लम्पी आजाराचा फटका यावर्षीच्या गाळप हंगामामध्ये बैलगाडीवर ऊस तोडणी करणार्या मजुरांना बसला आहे. उसाची पिके यावर्षी चांगली आहेत. पावसाने साथ दिल्याने उसाच्या एकरी उत्पादनामध्ये वाढ होण्यास मदत होणार आहे. छत्रपती कारखान्याच्या कार्यक्षेत्रात सुमारे दहा लाख टन ऊस गळितासाठी उपलब्ध होण्याची शक्यता आहे. अतिरिक्त उसाच्या गाळपाचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी यंदा कारखान्याने 14 लाख टन उसाचे गाळप करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे.