हिंजवडी : भातपिकाच्या लोंब्या भरणीस सुरुवात | पुढारी

हिंजवडी : भातपिकाच्या लोंब्या भरणीस सुरुवात

हिंजवडी, पुढारी वृत्तसेवा: भाताचे आगार असलेल्या मावळ-मुळशी परिसरात आता भातपिके जोमात आहेत. मावळच्या पवन, आंदर व नाणे परिसरात तर मुळशीत रिहे, कोळवन, मुठा आणि मुळशी खोर्‍यासह आयटी परिसरात मुबलक पाऊस पडतो आहे. त्यामुळे या भागातील भातपिके जोमात आहेत.

या भागातील भात खाचरांमध्ये जोरदार पावसामुळे पाणी उपलब्ध होत असल्याने परिसरातील शेतकरी खरिप हंगामात मुख्य पीक म्हणून भातपिकाची मोठ्या प्रमाणात लागवड करतात. सध्या परिसरातील भातपीक जोमात आले असून भातपिकांच्या लोंब्या भरण्यास सुरुवात झाली आहे.

विशेष म्हणजे सप्टेंबरमध्ये खडखडीत उन्हानंतर पाऊस झाल्याने पिके जोमात आहेत. नाणेमावळात पावसाच्या हलक्या सरी का असेना, पण दिवसातून दोन-तीन वेळा पडत असल्याने भातपिकाच्या वाढीकरिता त्या पूरक ठरत आहेत. काही दिवसांवर दिवाळी येऊन ठेपली आहे. शेतकर्‍यांची सुगीची तयारी सुरू झाली आहे.

Back to top button