पुणे : राज्यात महिन्याला 2 लाख घरांची विक्री | पुढारी

पुणे : राज्यात महिन्याला 2 लाख घरांची विक्री

पुणे : दिगंबर दराडे :  जागतिक पातळीवर गेल्या काही महिन्यांपासून मंदीत सुरू असलेल्या घर खरेदीला महाराष्ट्रात अच्छे दिन आले आहेत. कोरोनाने कात टाकल्यानंतर घर विक्रीला बूस्ट मिळाला असून, राज्यात महिन्याला तब्बल सरासरी दोन ते अडीच लाख घरांची विक्री होत आहे. पुण्यासह राज्याची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत लहान आकाराच्या 1 आणि 2 बीएचके अपार्टमेंटस् गृह खरेदीदारांच्या पसंतीस उतरत आहेत. या कालावधीत एकूण मागणीच्या 69 टक्के आणि पुरवठ्यात 73 टक्के वाटा हा लहान आकाराच्या घरांचा होता. 2 बीएचकेची मागणी आणि पुरवठा अनुक्रमे 40 टक्के आणि 42 टक्के इतका राहिला आहे. चालू वर्षात घरांची मागणी (शोध) 15.2 टक्क्यांनी वाढली आहे. पुरवठा 3.8 टक्क्यांनी वाढला असल्याचे मॅजिकबि—क्स प्रॉपइंडेक्स अहवालात दिसून आले आहे.

‘क्रिडाई’चे राष्ट्रीय चेअरमन सतीश मगर दै. ‘पुढारी’शी बोलताना म्हणाले, नवीन घर खरेदी करणार्‍या ग्राहकांच्या संख्येत मोठ्या प्रमाणावर वाढ होत आहे. व्याज दर कपात आणि रोजगाराच्या वाढलेल्या संधी, यामुळे नागरिकांचा मालमत्ता खरेदीकडे कल वाढल्याचे समोर आले आहे. बांधकाम व्यावसायिक कृष्णकुमार गोयल म्हणाले, कोरोनामध्ये लोकांना घराचे महत्त्व समजले आहे. 1 बीएचके असलेले आता 2 बीएचके खरेदी करण्याकडे वळत आहेत. यामुळे घरांची मागणी दिवसेेंदिवस वाढत आहे.

 

म्हाडाच्या घरांनादेखील मागणी वाढली आहे. दीड वर्षात तब्बल पंधरा हजारांपेक्षा अधिक घरांचे वाटप करण्यात आले आहे.
                                                      – नितीन माने, सीईओ म्हाडा, पुणे विभाग

स्वतःचे घर हवे, हे कोरोना काळात प्रकर्षाने जाणवले. आमचे बजेट 50 लाख रुपयांचे होते. व्याज दर आणि घरांच्या किमती वाढण्यापूर्वी आम्ही घराचे स्वप्न साकार केले. –                                                            -सुहास लोणकर (ग्राहक)

Back to top button