मित्राला भेटायला पुण्यात आला अन पोलिसांच्या जाळ्यात अडकला ! | पुढारी

मित्राला भेटायला पुण्यात आला अन पोलिसांच्या जाळ्यात अडकला !

पुणे : पुढारी वृत्तसेवा :  सिंहगड पोलिस ठाण्याच्या हद्दीतील सनी चव्हाण याचा खून तर दत्तवाडी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील  खुनाच्या प्रयत्नाच्या गुन्ह्यामध्ये फरार असलेला संशयित आरोपी मित्राला भेटायला पुण्यात आल्यानंतर त्याला दत्तवाडी पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. प्रविण ऊर्फ घार्‍या चंद्रकांत खांबे (रा. दांडेकर पुल) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. खांबे हा सराईत गुन्हेगार असून, त्याच्यावर खून, हाणामारी, अपहरण असे गंभीर गुन्हे दाखल आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दत्तवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरिक्षक चंद्रकांत कामठे आणि पथक हद्दीमध्ये गस्त घालत होते. त्यावेळी खून आणि खुनाच्या प्रयत्नात फरार असलेला आरोपी खांबे मित्राला भेटण्यासाठी पुण्यातील महालक्ष्मी मंदीर शिवदर्शन
परिसरात येणार आहे. अशी माहिती पोलीस हवालदार कुंदन शिंदे, अमित सुर्वे आणि प्रशांत शिंदे यांना मिळाली. त्यानुसार पथकाने सापळा रचून आरोपीच्या मुसक्या आवळल्या. निरिक्षक (गुन्हे) विजय खोमणे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकातील पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत कामठे, सुनिल जगदाळे, हवालदार कुंदन शिंदे, प्रकाश मरगजे, अमित सुर्वे, प्रशांत शिंदे, सद्दाम शेख, नवनाथ भोसले, श्रीकांत शिंदे, किशोर वळे यांनी केली आहे.

घार्‍या रेकॉर्डवरील गुन्हेगार असुन त्याचेवर यापुर्वीही सन 2014 मध्ये वडगाव भागात एकाचे अपहरण करुन भोर वरंधा घाट येथे खून केल्याचा गुन्हा दाखल आहे. सनी चव्हाणचा खून केल्यानंतर तसेच चांदणे याच्यावर खुनी हल्ला केल्यानंतर तो त्याच्या मूळगावी महाड येथे जाऊन लपला होता. अखेर पुण्यात येणार असल्याची खबर मिळताच त्याच्या मुसक्या आवळण्यात आल्या आहेत. उपनिरीक्षक सुनिल जगदाळे हे पुढील तपास करत आहे.

 

ऑक्टोंबर रोजी पानमळा येथे पुर्व वैमनस्यातून कृष्णकुमार चांदणे याच्यावर खुनी हल्ला झाला होता. तेव्हापासून दत्तवाडी पोलिस त्याचा शोध घेत होते. सिंहगड पोलिस ठाणे हद्दीत सराईत गुन्हेगाराच्या वाढदिवसाला झालेल्या भांडणात सनी चव्हाण याचा 25 सप्टेंबर रोजी खून करण्यात आला होता. त्याच्यातही घार्‍या हा फरार होता. त्याला आमच्या पथकाने जेरबंद केले आहे.

                               – अभय महाजन, वरिष्ठ निरीक्षक, दत्तवाडी पोलिस ठाणे.

Back to top button