पुणे: कवठे येमाई, सविंदणेत अतोनात नुकसान, मुसळधार पावसाने झोडपल्याचा परिणाम | पुढारी

पुणे: कवठे येमाई, सविंदणेत अतोनात नुकसान, मुसळधार पावसाने झोडपल्याचा परिणाम

पिंपरखेड, पुढारी वृत्तसेवा: शिरूर तालुक्यातील कवठे यमाई, सविंदणे या परिसराला सोमवारी (दि. १७) रात्री झालेल्या मुसळधार पावसाने झोडपले. रात्री झालेल्या या पावसाने शेतकऱ्यांची दैना उडवली असून मोठ्या प्रमाणामध्ये जनावरांच्या चारा पिकांचे, तसेच रब्बीच्या पिकाबरोबरच जमिनीचे अतोनात नुकसान झाले आहे. या संकटातून बाहेर काढण्यासाठी शासनाकडून तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.

सोमवारी (दि. १७) रात्री १० वाजेनंतर कवठे येमाई, सविंदणे, मलठण या परिसरात आभाळ फाटल्यासारखा मुसळधार पाऊस कोसळला. दोन तास पडत असलेल्या या पावसाने शेतपिकांचे अतोनात नुकसान झाले. ऊस, चारा पिके भुईसपाट झाले. ओढे, नाले यांना मोठ्या प्रमाणात पूर आल्याने आणि शेतांचे तलाव झाले. रस्ते, शेतांचे बांध वाहून गेल्याचे पहायला मिळत आहे. काढणीस आलेल्या सोयाबीन पिकांचेही अतोनात नुकसान झाले आहे.

सविंदणे येथे जोरदार पावसाने नितीन नरवडे यांच्या जनारांचा गोठा उद्ध्वस्त होऊन मोठे नुकसान झाले. तसेच प्रगती नगर, लंघेमळा, किठे मळा येथील ओढ्यावरील छोटे पूल वाहून गेले आहेत. कवठे येमाई येथे जोरदार पडलेल्या पावसाने ओढ्यांना मोठ्या प्रमाणात पूराचे पाणी वाहिले. कवठे येमाईमधील संतोष देशमुख यांच्या घराचेही नुकसान झाले.

सोमवारी (दि. १७) सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास बेटभागातील पिंपरखेड, चांडोह, जांबुत या परिसरात काही ठिकाणी पावसाने तुरळक हजेरी लावली होती. रात्री या परिसरात हलक्या स्वरूपात पडत असलेला भिज पाऊस पहाटे पर्यंत सुरूच होता. दरम्यान पंचायत समिती सदस्य डॉ. सुभाष पोकळे यांनी घटनास्थळी जाऊन नुकसानग्रस्तांची भेट घेतली.

Back to top button