पुणे: कान्हुर मेसाईत ढगफुटी सदृश पावसाने हाहाकार | पुढारी

पुणे: कान्हुर मेसाईत ढगफुटी सदृश पावसाने हाहाकार

शिक्रापूर, पुढारी वृत्तसेवा: पारंपरीक दुष्काळी समजल्या जाणाऱ्या शिरूर तालुक्यातील कान्हूर मेसाई येथे सोमवारी संध्याकाळी सात ते रात्री तीन वाजेपर्यंत झालेल्या ढगफुटीसदृश पावसाने हाहाकार उडाला. घर, जनावरे, शेती तसेच शेतीपयोगी साहित्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

इंदिरानगर परिसरात असणाऱ्या जवळपास २० ते २५ कुटुंबांच्या घरात अडीच ते तीन फूट पाणी शिरल्याने घरातील मौल्यवान वस्तू तसेच अनेकांच्या घरातील संसारोपयोगी वस्तू  वाहून गेले. शिरूर-भीमाशंकर या रस्त्यावरील कान्हूर मेसाई-चिंचोली मोराची या पुलाला पाण्याच्या लोंढ्यामुळे भराव खचून मोठे भगदाड पडल्याने या रस्त्यावरील शिरूर-राजगुरुनगर जाणारी वाहतूक पूर्णपणे बंद झाली असल्याची माहिती सरपंच चंद्रभागा खर्डे  यांनी दिली.

कान्हुर मेसाई येथे सायंकाळी सात ते रात्री तीन वाजेपर्यंत चाललेल्या या पावसामुळे ढगेवाडी परिसरातील घुले तळ्याखालील असणारा नाला फुटला. त्यापुढील तळोले तळ्यावर पाण्याचा दाब आल्याने दुसरे तळे फुटले. त्याचा परिणाम आणि ढगफुटीसदृश पावसामुळे तळ्याचे बांध फुटल्याने कान्हुर मेसाई येथील इंदुबाई सुरवसे यांच्या घरातील तीन ग्राम सोने असलेली मनी-डोरले, तीन ग्रॅमची गळ्यातील पोत व जोडवी पाण्यात गेली. कैलास ननवरे यांच्‍या दुकानाचे पाण्याचा दाबाने शटर तुटून दुकानातील किराणा गेला. तसेच बाबुराव जयवंत थोरात यांचे घर पुराच्या पाण्यात वाहून गेले. सोमनाथ वाघुले यांच्या ही दुकानात पाणी शिरून जवळपास तीन लाखाचा दिवाळीसाठी भरलेला किराणा माल भिजून गेला. संभाजी भांडलकर यांच्या सात शेळ्या पावसाने मृत्यू पावल्या आहेत. प्रशासकीय अधिकारी यांनी तातडीने भेट देऊन नुकसानीची पाहणी सुरु केली आहे.

Back to top button