महत्वाची बातमी: ढगफुटी सदृश्य पावसामुळे पुणे-नाशिक महामार्ग ठप्प, | पुढारी

महत्वाची बातमी: ढगफुटी सदृश्य पावसामुळे पुणे-नाशिक महामार्ग ठप्प,

महाळुंगे इंगळे, पुढारी वृत्तसेवा: ढगफुटी सदृश्य पावसामुळे पुणे-नाशिक महामार्ग मंगळवार पहाटेपासून ठप्प झाला असून महामार्गावर चक्का जाम परिस्थिती निर्माण झाली.

मेदनकरवाडी हद्दीत बंगला वस्ती येथे महामार्गावर पाणी साचल्याने वाहने जागेवरच थांबली आहेत. वाहतूक विभागाने नाशिककडे जाणारी वाहतूक एमआयडीसीतून महाळुंगेमार्गे पीएमआरडी रस्त्याने वळवली. महामार्गावर मोशी ते शिरोलीपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. चाकण-तळेगाव रस्त्यावरही वाहतूक कोंडी झाली, त्यामुळे विद्यार्थी व कामगार वाहतूक कोंडीत अडकून पडले. नाणेकरवाडी उड्डाणपूल आणि आंबेठाण चौकातील उड्डाणपुलाखाली पाणी साचल्याने वाहतूक विस्कळीत झाली.

वाहतूक विभागाचे पोलीस उप आयुक्त आनंद भोईटे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकरराव डामसे व त्यांच्या टीमने महामार्गावरील पाणी काढण्यासाठी प्रत्यक्ष उपस्थित राहून जेसीबीच्या साहाय्याने चारी काढण्याचे काम सुरु आहे.

वाहतूक ठप्प झाल्याने मला मोशीहून चाकणला जायला चार तास लागले. माझ्या गाडीत माझी दोन मुले होती. त्यांना वाकीला शाळेत सोडून चाकणला फॅक्टरीत जायचे होते. सकाळी साडे सहा वाजता घरून निघून मी साडे दहाच्या सुमारास चाकणला पोहोचले. वाहतुकीत अडकल्याने खूप मानसिक व शारीरिक त्रास झाला. महामार्गाचे काम लवकर व्हावे, हीच शासनाकडे माझी मागणी आहे.
–  साक्षी उमेश सातव पाटील

Back to top button