पिंपरी : फाटाफुटीनंतर शिवसेनेची अवस्था आणखी नाजूक | पुढारी

पिंपरी : फाटाफुटीनंतर शिवसेनेची अवस्था आणखी नाजूक

नंदकुमार सातुर्डेकर

पिंपरी : आधीच ग्लानी आलेल्या शहर शिवसेनेची फाटाफुटीनंतर अवस्था आणखी नाजूक झाली आहे. शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडानंतर खासदार श्रीरंग बारणे यांनी शिंदे गटात प्रवेश केला. काही मोजके पदाधिकारी व युवा सेनेचे पदाधिकारी वगळता फार कोणी त्यांच्या मागे गेल्याचे दिसत नसले तरी प्रा. रामकृष्ण मोरे यांच्या मुशीत तयार झालेल्या व कसलेले राजकारणी अशी ओळख असणार्‍या बारणे यांच्या बंडाकडे दुर्लक्ष करणे शिवसेनेला घातक ठरू शकते.

स्थानिक नेत्यांना आघाडीची आशा

महापालिका निवडणुकीत शिवसेनेला बरोबर घेण्याचे संकेत अजित पवार यांनी दिले. मात्र, मित्र पक्षांनी ताकदीपेक्षा जास्त जागा मागितल्यास एकला चलो रेची भूमिका घ्यावी लागेल, असा दम भरल्याने आघाडीबाबत साशंकता आहे. राष्ट्रवादीची ताकद, इच्छुकांची मोठी संख्या, आघाडी झाल्यास अनेक ठिकाणी बंडाची शक्यता लक्षात घेता सेनेचे ओझे खांद्यावर घेणे राष्ट्रवादीला परवडणार का असा प्रश्न आहे. त्यामुळे शिवसेनेला स्वतंत्र लढण्याची तयारी करणे गरजेचे आहे. तरीही राज्यात निर्माण झालेल्या राजकीय परिस्थितीमुळे मनपा निवडणुकीत आघाडी होण्याची आशा स्थानिक नेत्यांना आहे.

मागील वेळी स्वतंत्र्य लढताना शिवसेनेची दमछाक

महापालिकेच्या सन 2017 मध्ये झालेल्या निवडणुकीत भाजपने शिवसेनेशी युतीची चर्चा रेंगाळत ठेवली. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी महापालिका निवडणुकीत युती तुटल्याची घोषणा केल्याने स्वतंत्र लढताना शिवसेनेची दमछाक झाली. भाजपने देवेंद्र फडणवीस यांना प्रचारात आणून व राष्ट्रवादीतून आलेल्या आमदार महेश लांडगे, लक्ष्मण जगताप, आझम पानसरे यांच्या बळावर महापालिकेत एक हाती सत्ता आणली. दुसरीकडे राष्ट्रवादीने काँग्रेसला बेसावध ठेवून ऐनवेळी तोंडावर पाडले. त्यावेळी स्वतंत्र लढत राष्ट्रवादीने 36 जागांवर विजय मिळवला. काँग्रेसच्या हाती भोपळा आला. या वेळी शिवसेना ठाकरे गटाबाबत असे घडणार नाही ना? असा प्रश्न केला जात आहे.

यंदा 50 नगरसेवक निवडून आणण्याचे टार्गेट

महापालिकेच्या मागील निवडणुकीत अवघ्या नऊ जागा जिंकलेल्या सेनेने येत्या निवडणुकीत 50 नगरसेवक निवडून आणण्याचे टार्गेट ठेवले आहे. महापौर शिवसेनेचाच होईल. 55 आमदारांमध्ये आमचा मुख्यमंत्री होऊ शकतो मग पन्नास नगरसेवकांमध्ये शिवसेनेचा महापौर का नाही होणार असा प्रश्न शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी भोसरी मेळाव्यात केला होता. मात्र, 50 जागा जिंकण्याची शिवसेनेची तयारी दिसत नाही . पालिका बरखास्त होण्याआधी सत्ताधारी नगरसेवकच महापालिकेतील चुकीच्या कामांविरोधात आवाज उठवताना दिसले; पण पंतप्रधान आवास, वेस्ट टू एनर्जी, यांत्रिकी पद्धतीने सफाई, नदी सुधार, स्मार्ट सिटी घोटाळा या विषयावर भाजपला घेरण्यात सेना अपयशी ठरली असल्याचे बोलले जात आहे.

गटातटाच्या राजकारणामुळे संघटना पोखरली

शिवसेनेतील गटातटाच्या राजकारणामुळे पक्ष संघटना पोखरली गेली आहे. राज्यात शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर खासदार श्रीरंग बारणे यांनी आपण उद्धव ठाकरे यांचीच पाठराखण करणार असल्याचे सांगितले. परंतु, काही दिवसातच त्यांनी शिंदे गटात प्रवेश केला. सरिता साने, बाळासाहेब वाल्हेकर, राजेश वाबळे, युवा सेनेचे विश्वजीत बारणे, निलेश हाके, माऊली जगताप हे कार्यकर्ते शिंदे गटात सामील झाले आहेत. शहरप्रमुख सचिन भोसले, माजी आमदार गौतम चाबुकस्वार, जिल्हा संघटिका सुलभा उबाळे, माजी शहर प्रमुख राहुल कलाटे उद्धव ठाकरे गटात आहेत. मात्र. त्यातही गटातटाचे राजकारण सुरू आहे.

जुने कार्यकर्ते अ‍ॅक्टिव्ह

शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनी शिंदे गटात प्रवेश केल्याने शिवसेना ठाकरे गटातील जुने कार्यकर्ते तसेच खा. बारणे यांचे पक्षांतर्गत विरोधक पुन्हा अ‍ॅक्टिव्ह झाले आहेत. मात्र, खा. बारणे यांनी नुकत्याच झालेल्या पत्रकार परिषदेत भाजपशी युतीचे संकेत दिल्याने आता शिवसेना ठाकरे गट या युतीशी मुकाबला कसा करणार याकडे राजकीय निरीक्षकांचे लक्ष लागले आहे.

शहरप्रमुखांच्या विरोधात मोहीम

शहरप्रमुख भोसले यांच्या विरोधात मोहीम सुरू आहे. शहरप्रमुख पदासाठी माजी आमदार गौतम चाबुकस्वार, राहुल कलाटे यांच्याबरोबरच सुलभा उबाळे यांचेही नाव चर्चेत आहे. मात्र, सचिन भोसले यांनी कठीण काळात पक्षाची पाठराखण केली असल्याने शहर प्रमुख बदलल्यास लोकात वेगळा संदेश जाईल. भोसले यांनी काही वेगळी भूमिका घेतल्यास काय? असा प्रश्न पक्ष नेतृत्वापुढे आहे. शहरप्रमुख पदी नवीन व्यक्तीची नेमणूक केली तरी सर्व गटातटांना बरोबर घेऊन जाण्याचे मोठे आव्हान नेतृत्वापुढे असणार आहे.

Back to top button