पुणे: म्हाडाचा 4 हजार घरांचा दिवाळी धमाका ; सर्वसामान्यांचे हक्काच्या घराचे स्वप्न पूर्ण होणार | पुढारी

पुणे: म्हाडाचा 4 हजार घरांचा दिवाळी धमाका ; सर्वसामान्यांचे हक्काच्या घराचे स्वप्न पूर्ण होणार

पुणे, पुढारी वृत्तसेवा : पुणे म्हाडाच्या वतीने ऐन दिवाळीच्या मुहूर्तावर तब्बल 3 हजार 930 घरांची सोडत काढण्यात येणार आहे. यामध्ये 20 टक्क्यातील सुमारे दीड हजार घरे असून, शहरातील नामांकित बिल्डरांच्या प्रोजेक्टमध्ये ही घरे मिळणार आहेत. यामुळे सर्वसामान्य कुटुंबाला हक्काचे त्याच्या बजेटमधील घर मिळण्यास मदत होणार आहे. गेल्या दोन अडीच वर्षांत पुणे म्हाडाने मुख्य कार्यकारी अधिकारी नितीन माने-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तब्बल सात बंपर सोडत काढत नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. गेल्या दोन वर्षांत तब्बल 27 हजार 118 सर्वसामान्य कुटुंबाला हक्काचे घर मिळाले आहे.

पुणे गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळ (म्हाडा)च्या विविध योजनतील 3930 सदनिकांसाठी दिवाळीच्या मुहूर्तावर म्हणजेच 20 ऑक्टोबर रोजी ऑनलाईन सोडत काढण्यात येणार आहे. यासाठी 21 ऑक्टोबर पासून अर्ज भरण्यास सुरुवात होणार आहे. या चार हजार घरांमध्ये सुमारे दीड हजार घरे ही 20 टक्क्यांतील म्हणजे पुणे शहर आणि परिसरातील नामांकित बिल्डरांच्या प्रोजेक्ट मधील आहेत. पुणे म्हाडाच्या वतीने 11 ऑनलाईन सोडत काढण्यात येत असून, यापैकी सात सोडत माने यांच्या कार्यकाळात काढण्यात आल्या आहेत. गेल्या दोन वर्षांत कोरोना महामारीचे गंभीर संकट असताना माने यांनी पुढाकार घेत खाजगी बिल्डरांकडून मोठ्याप्रमाणात 20 टक्क्यांतील फ्लॅट उपलब्ध करून घेतले. यामुळेच गेल्या दोन वर्षांपासून तब्बल 27 हजार 118 लोकांचे हक्काच्या घराचे स्वप्न पूर्ण होण्यास पुणे म्हाडामुळे शक्य झाले आहे.

माने यांनी पुणे म्हाडाचा पदभार स्वीकारल्यानंतर सर्व खाजगी बिल्डरांची बैठक घेऊन कायद्यानुसार म्हाडाला 20 टक्के फ्लॅट तातडीने उपलब्ध करून देणे बंधनकारक असल्याचे ठणकावून सांगितले. यासाठी सतत पाठपुरावा केला. यामुळेच केवळ दोन अडीच वर्षांत पुण्यासह राज्यातील सर्वसामान्य व गरीब कुटुंबांना पुण्यात प्रसिद्ध, नामांकित बिल्डरांच्या प्रोजेक्टमध्ये परवडणाऱ्या दरामध्ये घरे उपलब्ध झाली. आता ऐन दिवाळीच्या मुहूर्तावर 3930 घरांची सोडत जाहीर करून पुणे म्हाडाने सर्वसामान्य लोकांना दिवाळी गिफ्टच दिले आहे.

गेले दीन वर्षांत काढलेल्या सोडत

जानेवारी 2021 : 5647
जुन 2021 : 2908
जानेवारी 2022 : 4231
एप्रिल 2022 : 2703
जुलै 2022 : 5221
ऑक्टोबर 2022 : 3930

Back to top button