दौंड: जलसंधारणामुळे गावे होतील दुष्काळमुक्त | पुढारी

दौंड: जलसंधारणामुळे गावे होतील दुष्काळमुक्त

खोर, पुढारी वृत्तसेवा: दौंड तालुक्यातील अनेक गावांची उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्यासाठी मोठी फरपट होत असते. साधारण मार्च ते जुलै या कालावधीत शेतकर्‍यांना पाणी समस्येचा सामना करावा लागतो. दौंड तालुक्याच्या दक्षिण भागात सर्वांत जास्त दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण होते. या भागात प्रामुख्याने जलसंधारण विभागाची कामे प्रभावीपणे अजूनही खर्‍या अर्थाने मोठ्या प्रमाणावर झालेली नाहीत. जलसंधारणाची योजना राबवून ही गावे दुष्काळमुक्त करण्यासाठी शासनाने पावले उचलण्याची गरज आहे.

पंचायत समिती, जिल्हा परिषदेसह राज्य सरकारने हा कार्यक्रम राबविला, तर या माध्यमातून दौंड तालुक्याच्या दक्षिण भागातील अनेक गावे दुष्काळमुक्तीच्या दिशेने वाटचाल केल्याशिवाय राहणार नाही. ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ मोहीम हाती घेऊन ओढ्यावर साखळी बंधारे बांधून जर वाहून जाणारे पाणी अडविले गेले, तर या गावांना मार्च महिन्यात जाणवणारी पाणीटंचाई कमी होण्यास नक्कीच मदत होईल.

खोर भागातील ओढ्यावर साखळी बंधारे बांधण्यात आली आहेत. मात्र, ओढ्यामध्ये सध्या मोठ्या प्रमाणावर गाळ साठला आहे. ओढ्यामधील गाळ काढणे कार्यक्रम हाती घेतल्यास मुबलक पाणीसाठा या माध्यमातून उपलब्ध होऊ शकतो. जलसंधारणामुळे दौंड तालुक्यातील खोर, देऊळगाव गाडा, नारायणबेट, माळवाडी, पडवी या गावांतील पाण्याची समस्या नक्कीच सुटू शकेल.

Back to top button