नायगाव : मावडी सुप्यात निकृष्ट कामांचा धडाका | पुढारी

नायगाव : मावडी सुप्यात निकृष्ट कामांचा धडाका

नायगाव, पुढारी वृत्तसेवा: मावडी सुपे (ता. पुरंदर) येथे सध्या निकृष्ट दर्जाच्या कामांचा धडाका सुरू आहे. समाजमंदिराचा पाया एकाच पावसात होत्याचा नव्हता झाला आहे. ठेकेदार व प्रशासनाने कामाच्या दर्जाबाबत झोपेचे सोंग घेतल्याचे दिसून येत आहे. निकृष्ट कामांची चौकशी करून दोषींवर कारवाईची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

मावडी सुपे येथे सुमारे दहा लाख रुपये खर्चून समाजमंदिराचे बांधकाम सुरू आहे. बांधकामाचा पाया निकृष्ट पद्धतीने भरलेला आहे. दोनच दिवसांपूर्वी बांधलेला पाया एकाच पावसात अस्ताव्यस्त झाला आहे. साहित्य निकृष्ट दर्जाचे असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले आहे. कामाचा फलकही लावलेला नाही. निकृष्ट दर्जाचे काम सुरू असताना ग्रामस्थांनी ते ठेकेदाराला थांबविण्यास सांगितले होते. मात्र ठेकेदार ग्रामस्थांच्या म्हणण्याला जुमानत नव्हते. यामुळेच ठेकेदारांच्या फायद्यासाठी प्रशासन कामाच्या दर्जाबाबत अनुकूल नसल्याचा आरोप ग्रामस्थ संभाजी देवकर यांनी केला. लाखो रुपयांचा निधी मिळविण्यासाठी लोकप्रतिनिधी पाठपुरावा करतात, प्रशासन मात्र गांभीर्याने घेत नाही. यामुळे विकासकामांसाठी आलेले लाखो रुपये शासनाच्या उदासीनतेमुळे पाण्यात जात असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.

निकृष्ट कामांसाठी वरदहस्त कोणाचा ?

आंबळे, नायगाव येथील निकृष्ट कामांच्या चौकशीची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. कामे सुरू असताना संबंधित विभागाचे अधिकारी संबंधित कामांना भेटीगाठी देतात, तरीही निकृष्ट दर्जाची कामे त्यांना दिसत नाहीत का? का निकृष्ट कामे झाली तरी ‘मी आहे ना’ असा म्हणणारा यांचा मोठा कोणी वरदहस्त आहे का, असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.

मावडी येथील समाजमंदिराचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे असल्याने ते थांबवले आहे. संबंधित ठेकेदाराला नव्याने बांधकाम करावयास सांगितले आहे.
– एस. वाय. चावरे, शाखा अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग

Back to top button