धक्कादायक! खुनाचा बदला खुनानेच घेण्याची वाढतेय प्रवृत्ती, चाकणमधील बालगुन्हेगारी चिंताजनक

धक्कादायक! खुनाचा बदला खुनानेच घेण्याची वाढतेय प्रवृत्ती, चाकणमधील बालगुन्हेगारी चिंताजनक
Published on
Updated on

अविनाश दुधवडे

चाकण : मागील काही काळात खून, खुनाचा प्रयत्न, खुनाचा बदला, जबरी चोर्‍या, लूटमार आणि गंभीर मारामार्‍या, अशा विविध गुन्ह्यांमध्ये अडकत असलेले बहुतांश आरोपी तरुण युवक आणि पंधरा ते सतरा वयोगटातील अल्पवयीन असल्याचे दिसून येत आहे. मागील वर्षी झालेल्या एका खुनाचा बदला घेण्यासाठी मागील आठवड्यात आणखी एक खून झाला. या खुनात प्रत्यक्ष सहभागी असलेल्या 12 जणांमध्ये 6 जण अल्पवयीन असल्याची बाब समोर आल्याने उद्योगनगरी चाकणमधील बालगुन्हेगारीचा विषय पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे.

चाकण मार्केट यार्डसमोरील पीडब्ल्यूडीच्या मोकळ्या जागेत डोक्यात दगड घालून मागील वर्षी (6 सप्टेंबर 2021 रोजी) रोहित सहानी (वय 17, रा. चाकण) या तरुणाचा खून झाला होता. याप्रकरणी युसूफ अर्षद काकर याच्यासह सहा जणांच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर सुमारे वर्षभराने युसूफ अर्षद काकर (वय 19 , रा. खंडोबा माळ, चाकण) या तरुणाची हत्या मागील सोमवारी (10 ऑक्टोबर 2022 रोजी) करण्यात आली. या प्रकरणी चाकण पोलिस ठाण्यात प्रणव संजय शिंदे या प्रमुख आरोपीसह 12 जणांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र या खुनात प्रत्यक्ष सहभागी झालेल्या 12 पैकी 6 जण अल्पवयीन असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. चाकणमध्ये गेल्या काही महिन्यांच्या काळात गुन्हा- अटक- सुटका आणि पुन्हा गुन्हा अशा दुष्टचक्रात अडकलेल्या बालगुन्हेगारांची संख्या धक्कादायकरीत्या वाढली आहे. या अल्पवयीन गुन्हेगारांची सामान्य नागरिकांत मोठी दहशत असल्याची बाब समोर येत आहे.

चार वर्षांपूर्वी (2018) चाकण येथील शिवाजी विद्यालयात इयत्ता नववीमध्ये शिक्षण घेणार्‍या सोळा वर्षीय अल्पवयीन विद्यार्थाचा खून आणि त्याच्या सतरा वर्षीय मित्रावर झालेल्या प्राणघातक हल्ल्यानंतर पसरत गेलेला बालगुन्हेगारीचा विळखा रोखण्यात प्रशासनाला अपयश आले आहे.

गुन्हेगारीच्या क्रौर्य इतिहासावर नजर टाकल्यास चाकणची बाल गुन्हेगारी मागील काळात वाढत गेल्याचे दिसून येते. मागील काही वर्षांत प्रशांत बिरदवडे (वय 19), त्यानंतर अनिकेत शिंदे (वय 16) याचा खून, त्या आधी मुटकेवाडीतील रोहन भुरूक खून, महाळुंगेतील संतोष वाळके, त्यानंतरचा हर्षल बोर्‍हाडे खून, त्याचप्रमाणे अन्यत्र युवकांकडून झालेल्या खून आणि खुनाच्या प्रयत्नाच्या घटना, प्रचंड वाढलेले पिस्तूल कल्चर आणि यातील अल्पवयीन मुलांचा सहभाग हे सगळे प्रकार धक्कादायक मानले जात आहेत.

अल्पवयीन गुन्हेगारीकडे आकृष्ट होण्यासाठी दबदबा, सूड घेणे, कुख्यात होणे, हलाखीची परिस्थिती आणि स्वतःचे किंवा आपल्या युवकांच्या गटाचे वर्चस्व निर्माण करण्याच्या इर्षेतून खून, खुनाचा प्रयत्न, दोन गटांमधील संघर्ष असे प्रकार सातत्याने घडू लागले आहेत. भाईगिरीचे आकर्षण, घरची परिस्थिती अशा कारणांमुळे अल्पवयीन मुले गुन्हेगारी क्षेत्राकडे वळत असून, यामुळे चाकण औद्योगिक भागातील कायदा आणि सुव्यवस्थेचा भंग होत आहे.

धोक्याची घंटा

वाढती बालगुन्हेगारी आणि 'जुवेनाईल जस्टीस अ‍ॅक्ट'च्या मर्यादा पोलिसांचे हात बांधून ठेवत आहेत. अल्पवयीन गुन्हेगारांना आणि त्यांना वापरून घेणार्‍या मंडळींना कायद्याची मर्यादा माहिती असल्यामुळे अशा बालगुन्ह्यांचे प्रमाण चाकण परिसरात वाढत असल्याचेही दिसून येते. यातील काही युवक आणि अल्पवयीन अनवधानाने गुन्हेगारीच्या जाळ्यात ओढले जाऊन गंभीर गुन्हे घडत आहेत. काही युवकांना गुन्हेगारीचे प्रचंड आकर्षण निर्माण झाले असून, त्यातून गंभीर गुन्हे करून गुन्हेगारी क्षेत्रात दबदबा निर्माण करण्याकडे त्यांची सुरू असलेली वाटचाल ही धोक्याची घंटा मानली जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news