पुणे : व्यवसाय अभ्यासक्रम संस्थांसाठी संधी ; मान्यतेसाठी 15 ते 27 ऑक्टोबरदरम्यान अर्ज करता येणार | पुढारी

पुणे : व्यवसाय अभ्यासक्रम संस्थांसाठी संधी ; मान्यतेसाठी 15 ते 27 ऑक्टोबरदरम्यान अर्ज करता येणार

पुणे : पुढारी वृत्तसेवा :  राज्य तंत्रशिक्षण मंडळाच्या अखत्यारीतील शासनमान्य विविध प्रकारच्या अल्प मुदतीच्या व्यावसायिक पदविका अभ्यासक्रमांसाठी नवीन संस्था सुरू करता येणार आहे. संबंधित अभ्यासक्रमाच्या मान्यतेसाठी 15 ते 27 ऑक्टोबरदरम्यान अर्ज करता येणार असल्याचे राज्य तंत्रशिक्षण मंडळाचे सचिव डॉ. महेंद्र चितलांगे यांनी स्पष्ट केले आहे.

अल्प मुदतीच्या व्यावसायिक पदविका अभ्यासक्रमांसाठी नवीन संस्था सुरू करणे, अस्तित्वात असलेल्या संलग्नित संस्थामध्ये नवीन अभ्यासक्रम सुरू करणे, अभ्यासक्रमांची अदलाबदल करणे, प्रवेश क्षमतेत बदल करणे, संस्थेच्या नावात बदल करणे, संस्थेच्या व्यवस्थापनात बदल करणे, संस्थेचे स्थानांतरण करणे तसेच अभ्यासक्रम किंवा संस्था बंद करण्यासाठी ऑनलाइन पद्धतीने प्रस्ताव मागविण्यात आले आहेत. हे प्रस्ताव सादर करताना अर्जदार संस्थांनी महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाच्या ुुु.ाीलींश.ेीस.ळप या संकेतस्थळावरील मान्यता प्रक्रिया पुस्तिकेमधील नमूद अभ्यासक्रमांकरिता दिलेल्या नमुन्यात ऑनलाइन प्रस्ताव आवश्यक त्या कागदपत्रांसह अपलोड करणे गरजेचे आहे.

मंडळाच्या अखत्यारीतील अभ्यासक्रम हे कायम विनाअनुदानित तत्त्वावर असून संबंधित अभ्यासक्रमांकरिता कोणत्याही प्रकारचे अनुदान शासनामार्फत दिले जाणार नाही. कोणत्याही संस्थेने शासनमान्यता व मंडळाची संलग्नता मिळाल्याशिवाय विद्यार्थ्यांचे प्रवेश करू नयेत. मान्यता नसतानाही विद्यार्थ्यांना प्रवेश दिल्यास, त्यास संपूर्णत: संस्था जबाबदार राहील, असे मंडळाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.

Back to top button