पुणे : सर्प विज्ञान संस्थेचे अध्यक्ष अनिल खैरे यांचे निधन | पुढारी

पुणे : सर्प विज्ञान संस्थेचे अध्यक्ष अनिल खैरे यांचे निधन

पुणे : पुढारी वृत्तसेवा : भारतीय सर्प विज्ञान संस्थेचे अध्यक्ष अनिल सखाराम खैरे (वय 65) यांचे अल्पशा आजाराने रविवारी निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी आणि मुलगा आहे.  कात्रज सर्पोद्यान आणि अनाथ प्राणी, पक्षी अनाथालय यांचे व्यवस्थापन ही संस्था सांभाळते. याच संस्थेतर्फे पिंपरी- चिंचवड महापालिकेच्या बहिणाबाई उद्यानाचे संचालक म्हणूनही त्यांनी काम सांभाळले. बारावी पास झाल्यानंतर खैरे यांनी आयटीआयचे शिक्षण घेतले. त्यानंतर टेल्को कंपनीत काही वर्षे नोकरी केली. त्यांचे बंधू विख्यात सर्पतज्ज्ञ निलीमकुमार खैरे यांच्या प्रमाणेच त्यांनाही निसर्ग संवर्धन आवड निर्माण झाली.

पुढे त्यांनी इंग्लंडमधील जर्सी वाईल्ड लाईफ कन्झर्वेशन ट्रस्टचे (सध्याची ड्यूरेल वाईल्ड लाईफ ट्रस्ट) प्रशिक्षण घेतले होते. वन्यजीव वाचविण्यासाठी त्यांचा सक्रिय पुढाकार असायचा. कोंढवा भागात आलेला बिबट्या सुरक्षितरीत्या पकडून निसर्गात सोडण्याची मोहीम त्यांच्या नेतृत्वाखाली झाली. अशा प्रकारे अनेक मोहिमांमध्ये त्यांचा सहभाग होता. हार्पिटन या नावाचे शास्त्रीय संशोधन निबंध असलेले नियतकालिक प्रसिद्ध करण्यात त्यांचा मोठा वाटा होता.

Back to top button