पुणेकरांचा खरेदीचा ‘सुपर संडे’ ! मध्य वस्तीत दिवाळीच्या खरेदीसाठी तुफान गर्दी

पुणेकरांचा खरेदीचा ‘सुपर संडे’ ! मध्य वस्तीत दिवाळीच्या खरेदीसाठी तुफान गर्दी

पुणे /कसबा पेठ : पुढारी वृत्तसेवा : मध्य वस्तीतील बाजारपेठांमध्ये रविवारी (दि. 17) खरेदीसाठी आलेल्या नागरिकांची तुफान गर्दी झाली. त्यामुळे दिवाळीपूर्वी खरेदीचा सुपर संडे ठरला. बच्चेकंपनीला घेऊन अनेक कुटुंबे बाजीराव रस्ता, शिवाजी रस्ता तसेच लक्ष्मी रस्त्यावर आली होती. माणसांबरोबरच वाहनांचीही गर्दी झाल्याने या भागात प्रचंड कोंडी झाली होती. यातून मार्ग काढताना वाहनचालकांच्या नाकीनऊ आले. रविवारची सुटी आणि आठवड्यावर येऊन ठेपलेल्या दिवाळी सणाच्या खरेदीसाठी पुणेकर नागरिकांसह उपनगर भागातील आणि जिल्ह्यातील नागरिक सहकुटुंब पुण्यातील प्रसिद्ध बाजारपेठांमध्ये आल्याचे चित्र रविवारी दिसले.

संपूर्ण मध्य वस्तीचा परिसर नागरिकांच्या गर्दीने जाम झाला होता. मात्र, तरीदेखील नागरिक मध्य वस्तीबाहेर जिथे जागा मिळेल, तिथे वाहन पार्क करून खरेदी करण्यासाठी मध्य वस्तीत जाताना दिसत होते. लक्ष्मी रस्ता, कुमठेकर रस्ता, केळकर रस्त्यावरील कपड्यांची, दागिण्यांची दुकाने पुणेकरांच्या गर्दीने गजबजली होती. बहुतांश पुणेकर येथील कपड्यांच्या दुकानांमधून कपडे खरेदी करून जाताना दिसत होते. विविध दुकानांतील कपड्यांच्या बॅगा त्यांच्या हातात पाहायला मिळत होत्या. दिवाळी सणानिमित्त खरेदीसाठी आलेल्या नागरिकांच्या गर्दीमुळे येथील परिसराला रविवारी जत्रेचे स्वरूप आले होते.

शिवाजी रस्त्यावर वाहनांच्या रांगा
मध्य वस्तीत अप्पा बळवंत चौकातून जाणारा रस्ता वाहतूक पोलिसांनी बंद केला होता. मात्र, तरीसुद्धा पुणेकर नागरिक गल्लीबोळातील रस्त्यांमधून आपली वाहने मंडई, दगडूशेठ परिसर, बेलबाग चौकातून शिवाजी रस्त्यावर आणतच होते. त्यांच्या वाहनांमुळे शिवाजी रस्ता स्वारगेटपासून महापालिकेपर्यंत जाम झाला होता. वाहनचालक दोन ते अडीच तास या वाहतूक कोंडीत अडकून पडले होते.

या भागात गर्दी
दगडूशेठ परिसरातील मजूर अड्डा चौक, बेलबाग चौक, मंडई, बोहरी आळी, रविवार पेठ, टिळक रस्ता, बाजीराव रस्ता, शिवाजी रस्ता, लक्ष्मी रस्ता, कुमठेकर रस्ता, केळकर रस्ता, फर्ग्युसन रस्ता, जंगली महाराज रस्त्यासह मध्य वस्तीतील छोटे रस्ते, गल्लीबोळांमध्ये तुफान गर्दी झाली होती.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news