पुणे : कुष्ठरोग प्रसाराचा दर राज्यात देशापेक्षा दुप्पट | पुढारी

पुणे : कुष्ठरोग प्रसाराचा दर राज्यात देशापेक्षा दुप्पट

पुणे : पुढारी वृत्तसेवा :  राज्यात 13 ते 30 सप्टेंबरदरम्यान सुरू करण्यात आलेल्या विशेष मोहिमेंतर्गत 8 कोटींहून अधिक लोकांची तपासणी करण्यात आली. त्यामध्ये 6200 हून अधिक कुष्ठरोगी आढळून आले आहेत. महाराष्ट्राचा 2021-22 या वर्षातील कुष्ठरोगाच्या प्रसाराचा दर 0.89 देशाच्या प्रसार दराच्या (0.45) तुलनेत दुप्पट आहे.  कोरोना साथीच्या दोन वर्षांमध्ये नियमित सर्वेक्षणामध्ये अडथळा निर्माण झाला होता. आता आरोग्य विभागाकडून विशेष मोहिमेवर भर देण्यात आला. सर्वाधिक कुष्ठरुग्ण चंद्रपूर जिल्ह्यात 1059 इतके आढळून आले आहेत.

एप्रिल ते सप्टेंबर यादरम्यान 12,540 नवीन कुष्ठरुग्णांची नोंद झाली. त्यापैकी 13 ते 30 सप्टेंबर या कालावधीत 6231 रुग्ण आढळले. वाढत्या सर्वेक्षणामुळे आणि देखरेखीमुळे जास्त रुग्ण शोधून काढण्यात यश आले आहे. सर्व रुग्ण शोधून त्यांना उपचार देणे आणि संक्रमणाची साखळी तोडणे आवश्यक आहे.
           – डॉ. रामजी आडकेकर, सहायक संचालक,  सार्वजनिक आरोग्य विभाग

तपासणी मोहिमेत 6231 रुग्ण आढळून आले. आठ कोटींहून अधिक लोकांची तपासणी करण्यात आली. त्यामध्ये 3,59,539 संशयित रुग्ण नोंदविले गेले. याव्यतिरिक्त नियमित निरीक्षण मोहिमेदरम्यान एप्रिल ते ऑगस्ट 2022 यादरम्यान राज्यात एकूण 6309 प्रकरणांची नोंद झाली. सप्टेंबरअखेरपर्यंत राज्यात एकूण 12540 रुग्ण आढळले आहेत.

Back to top button