पुणे: ‘पीएमपी’ बस पळविण्याचा प्रयत्न; तरुणांना स्टंटबाजी भोवली | पुढारी

पुणे: 'पीएमपी' बस पळविण्याचा प्रयत्न; तरुणांना स्टंटबाजी भोवली

पुणे; पुढारी वृत्तसेवा : पीएमपी बस थांबवत नसल्याने जोरदार आरडाओरडा करून मला वाचवा, मला वाचवा, म्हणत एका प्रवाशाने गर्दी गोळा केली होती. ही घटना ताजी असतानाच आज (दि.१६) दुपारी दोन तरुणांनी स्टंटबाजी करण्यासाठी महापालिकेच्या बसस्टँडवरून बस पळवून नेण्याचा प्रयत्न केला. यावेळी सुरक्षारक्षकाने वेळीच हटकल्याने मोठी हानी टळली. यावेळी बसचे थोडसे नुकसानही झाले.

सुरज शशिकांत जडिये (वय 35, रा. कोथरूड) आणि मोहीत अविनाश चव्हाण (वय 26, रा. जनवाडी, गोखलेनगर) अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. त्यांना न्यायालयात हजर केल्यानंतर दोघांची जामीनावर सुटका करण्यात आली आहे. याबाबत जालिंदर गजेन्द्र खंडाळे (वय 27, रा. पर्वती दर्शन, साईमंदिर) यांनी फिर्याद दिली आहे.

पोलीस उपनिरीक्षक विशाल शिंदे यांनी सांगितले की, सुरज जडिये हा उच्चशिक्षित असून, तो नेटवर्क मार्केटींगमध्ये नोकरीस आहे. तर मोहीत चव्हाण हा हॉटेलमध्ये वेटरचे काम करतो. तर फिर्यादी हे सुरक्षा रक्षक आहे. रविवारी दुपारी सव्वा एकच्या सुमारास पुणे महापालिका भवन जवळील बसस्टॅापवर बस उभी होती. यावेळी दोन तरुण बसमध्ये शिरले. एकाने स्टेरींगवर बसून कोणालाही काही न सांगता बस सुरू करत विरूध्द गेटने बस काढली.

यावेळी फिर्यादी खंडाळे आणि त्यांचे सहकारी भिमराव सोनवणे यांनी पळत जाऊन बस आडविण्याचा प्रयत्न केला. परंतु, बस घेऊन जात असताना श्रमिक भवनाच्या बसस्टॉपच्या केबीनच्या उजव्या बाजूला दुसर्‍या बसचा डावा भाग घासून नुकसान झाले. याप्रकरणी दोघांना पकडून पोलिसांच्या हवाली करण्यात आले.

प्राथमिक तपासात त्यांचे बस पळविण्यामागचे कारण हे स्टंटबाजी करण्याचेच असल्याचे समजले आहे. त्यांच्यावर चोरी, सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान, संगणमत यासह विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली. दोघांची न्यायालयाने जामीनावर सुटका केली आहे.
विशाल शिंदे, पोलीस उपनिरीक्षक, शिवाजीनगर पोलीस ठाणे

हेही वाचलंत का ? 

Back to top button