उंडवडी सुपेसह पाच गावांत शंभर टक्के लसीकरण | पुढारी

उंडवडी सुपेसह पाच गावांत शंभर टक्के लसीकरण

उंडवडी : पुढारी वृत्तसेवा :  उंडवडी सुपे ( ता. बारामती) येथील पशुसंवर्धन दवाखान्यांतर्गत सहा गावांत जनावरांचा लम्पी स्किन आजार रोखण्यात पशुसंवर्धन विभागाला यश आले आहे. सहा गावांमध्ये एकाही जनावराचा या आजाराने मृत्यू झालेला नाही. परिणामी परिसरातील शेतकर्‍यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.  महिनाभरात परिसरातील उंडवडी सुपे, जराडवाडी, खराडेवाडी, उंडवडी कडेपठार या चार गावांत सहा जनावरांना लम्पी स्किन आजाराची लक्षणे आढळून आली होती. त्यामुळे शेतकर्‍यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. लम्पीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर पशुसंवर्धन विभागाच्या वतीने उंडवडी सुपे, उंडवडी कप, सोनवडी सुपे, जराडवाडी, कारखेल, खराडेवाडी या सहा गावांत जनावरांना मोफत लम्पी प्रतिबंधक लसीकरण मोहीम राबवली.

सहा गावांतील 6 हजार 500 जनावरांपैकी 6 हजार 100 जनावरांना सरकारी लस तर 200 जनावरांना खासगी, तसेच 300 जनावरांना बारामती दूध संघाकडून लस दिली. लम्पी झालेल्या जनावरांना वेळेत उपचार मिळाल्याने एकही जनावर दगावले नाही. परिसरात युद्धपातळीवर लसीकरण झाल्याने लम्पी आजाराचा फैलाव रोखण्यात पशुसंवर्धन विभागाला यश आले आहे.  लम्पी लसीकरणाची मोहीम यशस्वी करण्यासाठी पशुधन विस्तार अधिकारी डॉ. आर. आर. पाटील यांचे मार्गदर्शन मिळाले, असे उंडवडी सुपेचे पशुधन पर्यवेक्षक पी. बी. होळकर व परिचालक महेश गायकवाड यांनी सांगितले.

ग्रामीण भागातील शेतकरी दुग्ध व्यवसायावर अवलंबून असतो. परंतु जनावरांनाच लम्पी आजार झाल्याने दुग्ध व्यवसाय अडचणीत येण्याची भीती शेतकर्‍यांना होती. परंतु शंभर टक्के लसीकरण झाल्याने जनावरे रोगमुक्त होऊन पुन्हा दुग्ध व्यवसाय तेजीत आला आहे.
                                                                     – बाळासाहेब तावरे, शेतकरी

Back to top button