सोमेश्वर परिसर ऊसतोडणी कामगारांनी गजबजला | पुढारी

सोमेश्वर परिसर ऊसतोडणी कामगारांनी गजबजला

सोमेश्वरनगर : पुढारी वृत्तसेवा : सोमेश्वर सहकारी साखर कारखाना परिसरात ऊसतोडणी कामगारांच्या टोळ्या दाखल झाल्या असून, कामगारांमुळे परिसर गजबजून गेला आहे. दसर्‍याला बॉयलर अग्निप्रदीपन झाल्यानंतर गेल्याच आठवड्यात विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या हस्ते सोमेश्वरच्या गाळप हंगामाला सुरुवात झाली होती. गेल्या आठ दिवसांपासून परिसरात राज्याच्या विविध भागातून ऊसतोडणी कामगार दाखल होत आहेत. प्रत्यक्षात ऊसतोड सुरू झाली असून, पुढील सहा महिने हे कामगार कारखाना तळावर तसेच विविध गावांत ऊसतोडणी करणार आहेत.

बीड, उस्मानाबाद, जालना, अहमदनगर, पाटोदा, पाथर्डी, गेवराई, परभणी, यवतमाळ आदी भागांतील हजारो ऊसतोडणी मजूर दरवर्षी कारखाना परिसरात दाखल होत असतात. चालू वर्षी सोमेश्वरकडे जवळपास 16 लाख टन ऊस गाळपासाठी उपलब्ध आहे. हार्वेस्टर, बैलगाडी, ट्रक- टॅक्टर, डंपिंग आदींच्या माध्यमातून ऊसतोडणी व वाहतूक होणार आहे. कारखाना परिसरात या मजुरांकडून राहण्यासाठी झोपड्या उभ्या केल्या जात आहेत. कारखान्याकडून त्यांना निवासासाठी चटई, बांबू, पिण्याचे पाणी, वीज, शौचालय आदी सुविधा पुरविण्यात येत असल्याची माहिती कारखाना प्रशासनाने दिली. सोमेश्वर कारखान्यावर ऊसतोड मजुरांच्या झोपड्या तयार करण्याचे काम सुरू असल्याने परिसर गजबजून गेला आहे.

यंदाची दिवाळी पालावरच
आनंदाचा असलेला दिवाळी सण आठ-दहा दिवसांवर आला असतानाही आम्ही सर्व सोडून कारखान्यावर दाखल झाले आहोत. आता दिवाळी पालावरच साजरी करू, अशी प्रतिक्रिया ऊसतोड मजूर महिलांनी दिली.

रस्त्यालगतच्या तोडीला प्राधान्य
गेल्या आठ दिवसांपासून बारामतीच्या पश्चिम भागात मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. उसाच्या सरीत अजूनही पावसाचे पाणी साठून असल्याने ऊसतोड करण्यास अडचण येत आहे; मात्र कारखाना प्रशासनाने रस्त्याच्या लगतच्या तोडी देत हंगाम सुरू करण्यास प्राधान्य दिले आहे.

Back to top button