कामशेत परिसराला पावसाने झोडपले | पुढारी

कामशेत परिसराला पावसाने झोडपले

कामशेत : परिसरात पावसाने शुक्रवारी (दि. 14) जोरदार हजेरी लावली. अचानक आलेल्या जोरदार पावसामुळे कामानिमित्त बाहेर पडलेल्यांची त्रेधातिरपीट उडाली. गेल्या तीन-चार दिवसांपासून परिसरात ढगाळ वातावरण होते. त्यामुळे पाऊस पडण्याची शक्यता वर्तविली जात होती. कामशेत परिसरात सायंकाळी पाचनंतर पावसाला सुरुवात झाली. वादळी वार्‍यासह झालेल्या पावसामुळे सर्वत्र पाणीच पाणी झाले होते.

पावसामुळे व्यापार्‍यांचे नुकसान

दिवाळी जवळ आल्यामुळे अनेक नागरिकांनी खरेदीचा प्लान बनविला होता. परंतु, अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची निराशा झाली. तसेच, यामुळे व्यापार्‍यांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. तसेच ढगाळ वातावरण व अवेळी पडणारा पाऊस याचा परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होत आहे.

सध्या पडत असलेला पाऊस शेतीसाठी धोकादायक नाही; पण अजून काही दिवस असाच पाऊस पडला तर याचा परिणाम भातशेतीवर होण्याची शक्यता आहे. ज्यांनी भाताची लागवड लवकर केली, त्यांचे नुकसान होऊ शकते. दरवर्षी भातपीक काढण्याचे काम दसर्‍यानंतर सुरू होत असे; पण या वर्षी दिवाळीनंतर भाताचे पीक काढण्यात येईल.
– गोरख ढोरे, शेतकरी, मळवंडी ढोरे

Back to top button