पिंपरी : बाजारपेठेत झगमगाट | पुढारी

पिंपरी : बाजारपेठेत झगमगाट

पिंपरी, पुढारी वृत्तसेवा: दिवाळी सण म्हणजे प्रकाशाचा सण. दिव्यांच्या झगमगाटाने परिसर न्हाऊन निघतो. हा प्रकाशाचा उत्सव साजरा करण्यासाठी नागरिक सज्ज झाले आहेत. या दिवाळीसणाला आणखी प्रकाशमान करण्यासाठी विविध आकारांतील आकाशदिवे व पणत्यांची खरेदी करण्यासाठी नागरिकांची बाजारपेठेत गर्दी होऊ लागली आहे. दिवाळी म्हटली की सर्वात महत्त्व असते दिव्यांना. दिवाळीमध्ये घर व परिसरात दिवे लावले जातात.

दिवाळीत लोकांचे घरोघरी उजळवते ती पणत्यांची आरास. विविध प्रकारच्या आणि विविधरंगी पणत्या बाजारात उपलब्ध आहेत. नेहमी वापरल्या जाणार्‍या पारंपरिक मातीच्या पणत्यांबरोबर आता काचेच्या, चिनीमातीच्या सुंदर नक्षीदार पणत्या नागरिकांचे लक्ष वेधून घेत आहेत; तसेच मातीच्या पणत्यांवर आकर्षक कोरीव नक्षीकाम केलेल्या, विविध आकारांच्या पणत्या बाजारात उपलब्ध आहेत. गोल, चौकोनी, षटकोनी आकाराच्या पणत्या विक्रीसाठी उपलब्ध आहेत.

आकर्षक कलाकुसर

सध्या बाजारात रंगबेरंगी विविध रंगसंगतीच्या पणत्या, मेणाचे दिवे, विविध आकारातील लामण दिवे, कुंदन, खडे, टिकल्या, चमक्या अशा अनेक विविध कलाकुसरीने घडवलेल्या पणत्याही विक्रीसाठी उपलब्ध आहेत. मेणापासून तयार केलेल्या फुलांच्या आकाराचे दिवे, जेलीसारखे दिसणारे दिवे, पाण्यात लावता येणारे दिवे 60 रुपयांपासून ते 200 रुपये डझन या भावात उपलब्ध आहेत.

लक्षवेधी आकाशकंदील

बाजारपेठेतील स्टॉल्सवर दिवाळीची शोभा वाढवणारे वेगवेगळ्या आकारांतील आणि आकर्षक रंगातील आकाशकंदील विक्रीसाठी
आले आहेत. याचबरोबर पाण्यावर तरंगणार्‍या मेणाच्या पणत्या बाजारात विक्रीस आल्या आहेत. यामध्ये काचेच्या भांड्यात तरंगणार्‍या गुलाब, कमळ, साध्या फुलांच्या आकाराच्या मेणाच्या पणत्यांचा समावेश आहे. आणखी नवीन म्हणजे मेणापासून तयार केलेल्या फुलांचे दिवे, गोल ग्लासमध्ये जेलीसारखे असणारे मेणाचे दिवे, कलर जेलीसारखे दिवे, मातीच्या रंगविलेल्या विविध आकाराच्या दिव्यांनी बाजारपेठ फुलून गेली आहे.

नक्षीकाम केलेल्या पणत्या

विविध रंगांनी सजवलेल्या चंदेरी-सोनेरी नक्षीकाम केलेल्या पणत्यांनाही ग्राहकांची विशेष पसंती आहे. हे दिवे पाच रुपयाला एक आणि 50 रुपये डझन या किंमतीला आहेत. मोठे दिवे हे 50 पासून ते 150 रुपयांपर्यंत उपलब्ध आहेत. या विविध प्रकारच्या आकर्षक पणत्या व दिवे नागरिकांचे लक्ष वेधून घेत आहेत.

घरगुती आकाशकंदील करण्याकडे कल

बाजारातील रेडिमेड आकाशकंदिल आणण्याऐवजी घरातच आकाशकंदील तयार करण्याकडे घरातील मोठी माणसे व बच्चेकंपनीचा कल आहे. यासाठी बाजारातून बांबूच्या काठ्या, कार्डबोर्ड पेपर, जिलेटिन, गोटीव, क्रेप असे विविध प्रकारांतील रंगीत कागद खरेदी करून आकाशकंदील तयार करण्याचे काम सुरू आहे.

कलाकुसरीची दिव्यांवर छाप

आपल्याकडे कुंभारवाड्यातील पारंपरिक दिव्यांबरोबरच दर दिवाळीला गुजरात, राजस्थान, बंगाल येथील कलाकुसरीचे दिवे मोठ्या प्रमाणात विक्रीस येतात. यामध्ये मटका, फाउंटन, मॅजिक दिवा, हत्ती, गणपती अशा विविध आकारांतील दिवे उपलब्ध आहेत. पारपंरिक दिव्यांबरोबरच परप्रांतीय कलाकुसरीची दिवे खरेदीकडे नागरिकांचा कल आहे.

Back to top button