विद्यार्थ्यांसाठी गुड न्यूज: लवकरच वायसीएमध्ये बीएसस्सी नर्सिंग महाविद्यालय | पुढारी

विद्यार्थ्यांसाठी गुड न्यूज: लवकरच वायसीएमध्ये बीएसस्सी नर्सिंग महाविद्यालय

पिंपरी : येथील महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय व पदव्युत्तर संस्थेत परिचारिकांसाठी बीएसस्सी नर्सिंग महाविद्यालय सुरू केले जाणार आहे. त्यासाठी राज्य सरकारची मान्यता मिळावी, यासाठी पत्रव्यवहार करण्यात आला आहे. राज्य सरकारच्या वैद्यकीय शिक्षण विभागामार्फत त्याला मंजुरी मिळावी, यासाठी पदनिर्मिती व आवश्यक मान्यतेचा प्रस्ताव वायसीएम रुग्णालय व पदव्युत्तर संस्थेच्या वतीने पाठविण्यात आला आहे. बीएसस्सी नर्सिंग व पॅरॉमेडिकल कोर्सेस सुरू करण्यासाठी परवानगी मिळावी, अशी मागणी या प्रस्तावात करण्यात आली आहे.

पदव्युत्तर संस्थेअंतर्गत बीएसस्सी नर्सिंग महाविद्यालय सुरू करण्यासाठी सुरुवातीला कंत्राटी पद्धतीवर 27 ते 30 प्राध्यापकांची पदे भरली जाणार आहेत. त्यानंतर सरळसेवा पद्धतीने भरतीप्रक्रिया राबवून नवीन पदभरती केली जाणार आहे. बीएस्सी नर्सिंग या अभ्यासक्रमासाठी 60 विद्यार्थी क्षमतेला मंजुरी घेतली जाणार आहे.

तीन टप्प्यावर मंजुरी प्रक्रिया

शासनाच्या वैद्यकीय शिक्षण विभागाचे आवश्यकता प्रमाणपत्र मिळविणे, महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाची संलग्नता मिळविणे आणि इंडियन नर्सिंग कौन्सिलची मान्यता घेणे, अशी कार्यवाही पूर्ण करावी लागणार आहे. त्यानंतर नर्सिंग अभ्यासक्रम सुरू होण्यासाठी दोन वर्षांचा कालावधी लागेल, अशी माहिती रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. राजेंद्र वाबळे यांनी दिली.

Back to top button