राजगुरुनगर बसस्थानक नव्हे, खड्ड्यांचे आगार, धोकादायक खड्ड्यांतून काढावा लागतो मार्ग | पुढारी

राजगुरुनगर बसस्थानक नव्हे, खड्ड्यांचे आगार, धोकादायक खड्ड्यांतून काढावा लागतो मार्ग

निमगाव दावडी, पुढारी वृत्तसेवा: पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील राजगुरुनगर बसस्थानक हे महत्त्वाचे बसस्थानक आहे. परंतु, गेले वर्षभर या स्थानकाची दुरवस्था झाली आहे. हे आगार नसून खड्ड्यांचे माहेरघर आहे की काय? असा प्रश्न पडतो आहे. परंतु, याकडे एसटी प्रशासन काणाडोळा करीत आहे.

राजगुरुनगर स्थानक परिसरात मोठे खड्डे पडले आहेत. त्यात सतत पडणार्‍या पावसामुळे पाणी साठत आहे. सर्वत्र दगडगोटे आणि आजूबाजूला राडारोडा पडला आहे. दररोज या बसस्थानकात लांब पल्ल्याच्या शेकडो बसगाड्या तसेच ग्रामीण भागातील अनेक बसगाड्या देखील ये-जा करतात. असे असताना प्रवाशांसाठी येथे कोणत्याही सुविधा उपलब्ध नाहीत.

उत्तर पुणे जिल्ह्याकडे जाणार्‍या प्रवाशांसाठी निवारा शेड व बसण्याची सोय नाही. पाणी साठल्याने डास, दुर्गंधी पसरली आहे. बसस्थानकातील खड्डेदुरुस्तीसाठी तात्पुरती मलमपट्टी केली जाते. वर्कशॉपजवळील सरंक्षक भिंतीचे काम सुरू आहे. चालक, वाहक विश्रांतिगृह परिसरात झाडेझुडपे, दगडगोटे पसरले आहेत. विश्रांतिगृहात फारशी स्वच्छता केली जात नाही. पाण्याच्या टाक्या स्वच्छ केल्या जात नाहीत.

स्थानकातील खड्ड्यांमुळे बसचे नुकसान होत आहे व खड्ड्यांतील पाण्यातून महिला, वृद्ध यांना बसमध्ये चढावे लागते. या बसस्थानकातील खड्डे दुरुस्त करावेत तसेच अन्य सुविध उपलब्ध कराव्यात, अशी मागणी प्रवासी करीत आहेत.

Back to top button