चांडोली खुर्दमधील माती बंधार्‍याची दुरुस्ती करा | पुढारी

चांडोली खुर्दमधील माती बंधार्‍याची दुरुस्ती करा

महाळुंगे पडवळ, पुढारी वृत्तसेवा: चांडोली खुर्द-ब्राह्मणमळा (ता. आंबेगाव) येथील माती बंधारा सततच्या पावसाच्या पाण्याने पूर्ण भरलेला आहे. या बंधार्‍याला सांडवा नसल्याने त्यामधून पाणी गळती होत आहे. या बंधार्‍याला लागून असणार्‍या शेतामध्ये पाणी साठत आहे. त्यामुळे बंधारा परिसरातील जमीन उपळत आहे. परिणामी शेतकर्‍यांच्या पिकांचे सतत नुकसान होत आहे. यामुळे या नुकसानीची जिल्हा परिषद छोटे पाटबंधारे विभागाने पाहणी करावी, अशी मागणी आंबेगाव तालुका किसान काँग्रेसचे सरचिटणीस बाळासाहेब इंदोरे व शेतकर्‍यांनी केली आहे.

सन 1972 मधील दुष्काळ परिस्थिती असताना या बंधार्‍याचे रोजगार हमी योजनेअंतर्गत काम करण्यात आले. त्यानंतर या बंधार्‍याची दुरुस्ती गेले अनेक वर्षे केली गेली नाही. मागील काही वर्षे अल्प पाऊस होत असल्याने बंधारा पूर्ण क्षमतेने कधीही भरत नव्हता. परंतु आता मुसळधार पाऊस पडत असल्याने बंधारा पूर्ण क्षमतेने भरला आहे. या माती बंधार्‍याला सांडवा काढण्यात आला नव्हता. सांडवा नसल्याने पाणी निचरा होत नाही. साठलेले पाणी परिसरातील शेतात पसरते. पिके असलेल्या शेतात उपळ तयार झाला आहे.

पिके असलेल्या शेतात सुमारे चार महिने पाणी साठून राहते. यामुळे शेतकरी त्रस्त झाला आहे. या माती बांधण्याची त्वरित दुरुस्ती करावी, सांडवा तयार करण्यात यावा, उपळ निघाल्याने नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करून भरपाई मिळावी, अशी मागणी येथील शेतकरी कुंडलिक थोरात, नीलेश थोरात, उमेश थोरात यांनी आंबेगाव तालुका छोटे पाटबंधारे विभागाच्या कार्यालयाकडे पत्राद्वारे केली आहे.

Back to top button