वेल्हे : सिंहगड भागात बिबट्याचा धुमाकूळ, पर्यटकांसह स्थानिकांत दहशत; कथित पट्टेरी वाघाचा शोध

file photo
file photo
Published on
Updated on

वेल्हे, पुढारी वृत्तसेवा: सिंहगड किल्ल्याच्या परिसरात कथित पट्टेरी वाघाची दहशत निर्माण झाली असताना बिबट्यांनी धुमाकूळ घातला आहे. बिबट्याच्या हल्ल्यात गडाच्या पायथ्याला डोणजे (ता. हवेली) येथे एका गाईचा मृत्यू झाला व नांदोशी (ता. हवेली) येथे एक वासरू जखमी झाले. कथित पट्टेरी वाघाचे दर्शन व बिबट्याच्या दहशतीमुळे पर्यटकांसह स्थानिक नागरिकांत घबराट निर्माण झाली आहे. हवेली पोलिसांचे पथक दोन दिवसांपासून व्हॅनमधून खबरदारीचे आवाहन करत गस्त घालत आहे.

सिंहगड किल्ल्याच्या परिसरात गुरुवार (दि. 13) सायंकाळपासून कथित पट्टेरी वाघाचा शोध घेण्यासाठी वन विभागाने रेस्क्यू टीमच्या मदतीने सर्चिंग ऑपरेशन सुरू केले आहे. मात्र, अद्याप जंगल व परिसरात कोठेही पट्टेरी वाघाचे अस्तित्व असल्याचे पुरावे मिळाले नाहीत. मात्र डोणजे तसेच सिंहगडाच्या परिसरात बिबट्यांच्या पायाचे ठसे मिळाले असल्याचे वनविभागाने स्पष्ट केले आहे.

डोणजे येथील शेतकरी संदीप पारगे हे शुक्रवारी (दि. 14) सकाळी सकाळी रानात गेले असता त्यांची एक गाय हिंस्र वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडल्याचे दिसले. ही माहिती मिळताच वनविभागाचे सहायक वनसंरक्षक दीपक पवार, वनपरिक्षेत्र अधिकारी प्रदीप संकपाळ, वनपरिमंडल अधिकारी वैशाली हाडवळे यांनी घटनास्थळी धाव घेतली. परिसराची पाहणी केली असता बिबट्याच्या पायाचे ठसे ठिकठिकाणी उमटल्याचे दिसले.दरम्यान, गुरुवारी सायंकाळी सिंहगडाच्या पूर्वेस असलेल्या नांदोशी येथे भगवान सणस यांच्या

जनावरांवर बिबट्याने हल्ला केला. त्यात एक वासरू जखमी झाले. भगवान सणस यांनी आरडाओरड केल्याने बिबट्या जंगलात पसार झाला. त्यामुळे वासराचे प्राण वाचले. भगवान सणस व स्थानिक ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार पट्टेरी वाघाने हल्ला केला आहे. मात्र, वनविभागाच्या म्हणण्यानुसार पट्टेरी वाघाच्या पाऊलखुणा कोठेही सापडल्या नाहीत.

पट्टेरी वाघाचे सिंहगडाच्या जंगलात अथवा परिसरात अस्तित्व असल्याचे पुरावे मिळाले नाहीत. मात्र, बिबट्याच्या पायाचे ठसे मिळाले आहे. त्यामुळे खबरदारीसाठी आवश्यक उपाययोजना सुरू केल्या आहेत. रेस्क्यू टीमसह वन विभागाने गुरुवारपासून शुक्रवार दिवसभर जंगल व परिसरात सर्चिंग ऑपरेशन राबवले. जंगलात टॅब कॅमेरे बसविण्यात येणार आहेत. आणखी शोध मोहीम राबविण्यात येणार आहे.
– प्रदीप संकपाळ, वनपरिक्षेत्र अधिकारी

पट्टेरी वाघाने जनावरांवर हल्ला केल्याचे अद्याप स्पष्ट झालेले नाही; मात्र बिबट्याच्या पायाचे ठसे मिळाल्याने बिबट्याच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडली असावीत, तसेच वासरू जखमी झाले असावे. याबाबत वरिष्ठ पातळीवर सखोल तपास सुरू आहे.
– वैशाली हाडवळे, वनपरिमंडल अधिकारी

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news