पुणे : लम्पीने जिल्ह्यात 184 जनावरांचा मृत्यू, सरकारकडून 128 पशुमालकांना अर्थसहाय्य | पुढारी

पुणे : लम्पीने जिल्ह्यात 184 जनावरांचा मृत्यू, सरकारकडून 128 पशुमालकांना अर्थसहाय्य

पुणे, पुढारी वृत्तसेवा: पुणे जिल्ह्यात लम्पी स्किनचा प्रादुर्भाव वाढला असून, त्यामुळे आत्तापर्यंत 184 जनावरांचा त्यात मृत्यू झाला आहे; तर 4 हजार 223 जनावरांना लम्पीची लागण झाल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. शासनाकडून मृत जनावरांसाठी पशुपालकांना मदतीची घोषणा करण्यात आली आहे. त्यानुसार आत्तापर्यंत 128 जणांना मदत दिल्याची माहिती जिल्हा शुसंवर्धन अधिकारी डॉ. शिवाजी विधाटे यांनी दिली.

जिल्ह्यामध्ये 8 लाख 11 हजार 103 जनावरांचे लसीकरण करण्याचे उद्दिष्ट पशुसंवर्धन विभागाकडे आहे. त्यापैकी आत्तापर्यंत 7 लाख 95 हजार 160 जनावरांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. लसीकरणासाठी पथके तयार करण्यात आली असून, या पथकांकडून गावोगाव वाड्या-वस्त्यावर फिरून जनावरांचे लसीकरण पूर्ण केले जात आहे. दरम्यान, सध्या लम्पी स्किनची बाधा झालेली 71 जनावरे गंभीर आहेत. तर 3 हजार 141 जनावरे आजारातून बरी झाली आहेत.

जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात लम्पीचा प्रादुर्भाव दिसत असून, इंदापूर, खेड आणि बारामती तालुक्यात बाधा होण्याचे प्रमाण सर्वाधिक आहे. मृत्यूचे प्रमाण देखील बारामती आणि इंदापूरमध्ये अधिक आहे. सध्या 827 सक्रीय जनावरांवर उपचार सुरू आहेत. सक्रीय असलेल्यांमध्ये देखील बारामती तालुक्यातच 134 जनावरे आहेत; तर भोर आणि वेल्हा तालुक्यात प्रत्येक एक सक्रीय जनावरावर उपचार सुरू आहेत. लम्पीचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून प्रयत्न केले जात आहेत. लसीकरणावर अधिकाधिक भर दिला
जात आहे.

लम्पीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लसीकरण मोठ्या प्रमाणावर केले आहे. लसीकरणानंतरही काही जनावरांमध्ये बाधा झाल्याचे आढळले आहे. पावसामुळे थोडा अडसर येत असून, असे वातावरण आजारवाढीसाठी पोषक मानले जाते. जनजागृती झाल्याने पशुपालकांकडून आता चांगला प्रतिसाद मिळत असल्याने योग्य उपचार करण्यात येत आहेत.
– डॉ. शिवाजी विधाटे, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी, जि.प.

Back to top button