बारामतीत तीन लाखांचा गुटखा जप्त | पुढारी

बारामतीत तीन लाखांचा गुटखा जप्त

बारामती, पुढारी वृत्तसेवा: उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालयाच्या पथकाने बारामती शहर व बांदलवाडी येथील गुटखा विक्रेत्यांवर छापे टाकले. या दोन कारवायांमध्ये तीन लाखांच्या मोटारीसह सुमारे तीन लाखांहून अधिक किमतीचा गुटखा जप्त करण्यात आला. दोघांविरोधात अन्नसुरक्षा आणि मानके अधिनियमानुसार विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिस कर्मचारी तुषार चव्हाण यांनी दिलेल्या फिर्यादीवरून रोहित लक्ष्मण चव्हाण (रा. बोरावकेवस्ती, बांदलवाडी, गुणवडी) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दि. 12 रोजी रात्री दोनच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. उपविभागीय पोलिस अधिकारी गणेश इंगळे यांना याबाबतची माहिती मिळाली होती. त्यांनी पोलिस उपनिरीक्षक युवराज घोडके यांना कारवाईच्या सूचना दिल्या. त्यानुसार पंचांना सोबत घेत पोलिस बोरावकेवस्ती येथे पोहचले. चव्हाण हा पोलिसांची चाहूल लागताच पळून जाऊ लागला. अंधाराचा फायदा घेत तो पसार झाला. पोलिसांनी त्याच्या घराची पाहणी केली असता तेथे तीन मोठ्या पांढर्‍या पिशव्यांमध्ये विविध प्रकारचा 2 लाख 37 हजार 600 रुपयांचा गुटखा मिळून आला. राज्यात गुटखा विक्री, उत्पादन व साठवणुकीला प्रतिबंध असताना त्याने तो घरात ठेवला होता. पंचांसमक्ष तो सील करण्यात आला.

दुसरी कारवाई बारामती शहरात करण्यात आली. या कारवाईत पंकज रमेश लुनिया (रा. देसाई इस्टेट, बारामती) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी पोलिस कर्मचारी वैभव साळवे यांनी फिर्याद दिली. या कारवाईत 66 हजार रुपयांच्या गुटख्यासह 3 लाख रुपयांची मोटार (एमएच 42, के 0297) पोलिसांनी जप्त केली. लुनियाने बेकायदेशीररीत्या गुटख्याचा साठा केला असून, मोटारीतून तो बारामतीमध्ये विक्रीला आणत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार इंदापूर रस्त्यावर हॉटेल ‘जायका’जवळ सापळा रचत ही मोटार अडविण्याचा प्रयत्न पोलिसांनी केला. परंतु, पोलिसांची चाहूल लागताच चालकाने मोटार भरधाव नेली. पोलिसांनी दुचाकीवरून पाठलाग करीत ती पकडली. चालकाची चौकशी केली असता त्याने आपले नाव पंकज रमेश लुनिया असल्याचे सांगितले. मोटारीतील पांढर्‍या पिशव्यांची झडती घेतली असता, त्यात 66 हजार रुपयांचा गुटखा पोलिसांना मिळाला.

Back to top button